'हे राम, नथुराम'च्या निमित्ताने काँग्रेसला मिळाला मुद्दा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जानेवारी 2017

नागपूर : 'हे राम, नथुराम' नाटक व त्याभोवती सुरक्षेवरून पोलिस आयुक्तांच्या गोळीबाराच्या धमकीने काँग्रेसला सत्ताधाऱ्यांविरोधात चांगलाच मुद्दा मिळाला आहे. याच मुद्द्यांवर सोमवारी (ता. 30) आंदोलनाची तयारी काँग्रेसने केली असून, पोलिस आयुक्तांना जनरल डायर पुरस्कार देण्यासाठीही काँग्रेसने कंबर कसली आहे.

नागपूर : 'हे राम, नथुराम' नाटक व त्याभोवती सुरक्षेवरून पोलिस आयुक्तांच्या गोळीबाराच्या धमकीने काँग्रेसला सत्ताधाऱ्यांविरोधात चांगलाच मुद्दा मिळाला आहे. याच मुद्द्यांवर सोमवारी (ता. 30) आंदोलनाची तयारी काँग्रेसने केली असून, पोलिस आयुक्तांना जनरल डायर पुरस्कार देण्यासाठीही काँग्रेसने कंबर कसली आहे.

नागपुरात नुकताच 'हे राम, नथुराम' या नाटकाचा प्रयोग पार पडला. नाटकाला काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करीत विरोध केला. नाटक सुरळीत पार पडावे यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्तच केला नाही, तर जाहीर फलक लावून गोळीबाराची धमकीही दिली. काँग्रेसच्या आंदोलनापूर्वी केलेल्या संविधान चौकातील (रिझर्व्ह बॅंक चौक) आंदोलनातही पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीमार केला होता. त्यामुळे काँग्रेसने पोलिसांवर दडपशाहीचा आरोप केला होता. 

या दडपशाहीविरोधात आंदोलनाची तयारी करीत काँग्रेसने महापालिका निवडणुकीसाठी बिगुल फुंकण्याची तयारी केली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांवर जनरल डायरसारखी दडपशाही करण्याची नागपूर पोलिसांची मानसिकता दिसून आली होती, असा गंभीर आरोप करणारी काँग्रेस सोमवारी नागपूर पोलिस आयुक्तांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणार आहे. त्यामुळे 'हे राम, नथुराम' नाटक काँग्रेसला सत्ताधाऱ्यांविरोधात मुद्दा देणारे ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

प्रमुख काँग्रेस नेत्यांचे नेतृत्त्व 
शहर काँग्रेसतर्फे महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी दुपारी तीनला व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने केली जाणार आहेत. यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते सीताबर्डी पोलिस ठाण्यात आंदोलन करतील. पोलिस आयुक्तांनी सीताबर्डी पोलिस ठाण्यात यावे यासाठी कार्यकर्ते आग्रह धरतील. येथेच सायंकाळी पाचला पोलिस आयुक्तांना 'जनरल डायर' हा पुरस्कार प्रदान करतील. या वेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार विलास मुत्तेमवार यांच्यासह शहरातील काँग्रेसचे नेते उपस्थित राहतील. प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेस व पोलिस संघर्ष होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Congress to protest against 'He Ram, Nathuram' in Nagpur