कॉंग्रेस, शिवसेनेने दिली महिलांना संधी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

अमरावती : महिला सक्षमीकरणाच्या गप्पा सारेच पक्ष मारत असतानाच विधानसभा निवडणुकीत महिलांना उमेदवारी देण्याच्या बाबतीत मात्र विविध पक्षांकडून चालढकल करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या आठपैकी चार मतदारसंघांत कॉंग्रेस व शिवसेनेने प्रत्येकी दोन महिलांना उमेदवारी दिली आहे. भाजप व राष्ट्रवादीने मात्र तसा पुढाकार घेतल्याचे दिसून येत नाही. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मागील 57 वर्षांत अमरावती जिल्ह्यात झालेल्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये आतापर्यंत चार महिलांना विधानसभेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.

अमरावती : महिला सक्षमीकरणाच्या गप्पा सारेच पक्ष मारत असतानाच विधानसभा निवडणुकीत महिलांना उमेदवारी देण्याच्या बाबतीत मात्र विविध पक्षांकडून चालढकल करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या आठपैकी चार मतदारसंघांत कॉंग्रेस व शिवसेनेने प्रत्येकी दोन महिलांना उमेदवारी दिली आहे. भाजप व राष्ट्रवादीने मात्र तसा पुढाकार घेतल्याचे दिसून येत नाही. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मागील 57 वर्षांत अमरावती जिल्ह्यात झालेल्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये आतापर्यंत चार महिलांना विधानसभेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. या महिलांमध्ये कोकिळा पाटील, वसुधा देशमुख, सुलभा खोडके आणि यशोमती ठाकूर यांचा समावेश आहे.
या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने तिवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूर व अमरावती मतदारसंघातून सुलभा खोडके यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने अचलपूरमधून सुनीता फिसके; तर बडनेरा मतदारसंघातून प्रीती बंड यांना उमेदवारी दिली. 2014 च्या निवडणुकीत भाजपने तिवसा मतदारसंघातून निवेदिता चौधरी यांना उमेदवारी दिली होती. या वेळी मात्र भाजपने धामणगावरेल्वे, अमरावती, मोर्शी, दर्यापूर व मेळघाट या पाचही मतदारसंघांतून एकाही महिलेला उमेदवारी दिलेली नाही. शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या तीनपैकी दोन मतदारसंघात मात्र त्यांनी महिलांना संधी दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चिन्ह असलेला एकच उमेदवार अमरावती जिल्ह्यात आहे, तो म्हणजे मेळघाट. मात्र त्यांनी पुरुषालाच संधी दिली. अमरावती जिल्ह्यातील विविध मतदारसंघांतून 47 महिलांनी आतापर्यंत विधानसभेची निवडणूक लढविली आहे. या 57 वर्षांत चार महिला विजयी झाल्या होत्या.

संधी हुकली
गेल्या निवडणुकीत तिवसा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर रिंगणात असलेल्या निवेदिता चौधरी यावेळीसुद्धा निवडणूक लढविण्याच्या तयारीत होत्या. मात्र, हा मतदारसंघ शिवसेनेला गेल्याने त्यांना संधी मिळाली नाही. दर्यापूर येथून सीमा सावळे यांना उमेदवारीची अपेक्षा होती; मात्र त्यांना तिकीट मिळाले नसल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress, Shiv Sena give women opportunities