कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीमार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जानेवारी 2017

नागपूर - रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉंग्रेसने पुकारलेल्या आरबीआय घेराव आंदोलनात संतप्त कार्यकर्त्यांनी बॅंकेच्या प्रवेशद्वारावर धडक दिल्याने कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी आज दुपारी लाठीमार केला. या लाठीमारामुळे एका महिला कार्यकर्तीसह आठ जण जखमी झालेत. 

नागपूर - रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉंग्रेसने पुकारलेल्या आरबीआय घेराव आंदोलनात संतप्त कार्यकर्त्यांनी बॅंकेच्या प्रवेशद्वारावर धडक दिल्याने कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी आज दुपारी लाठीमार केला. या लाठीमारामुळे एका महिला कार्यकर्तीसह आठ जण जखमी झालेत. 

अखिल भारतीय कॉंग्रेस समितीतर्फे नोटाबंदीविरोधात संविधान चौकात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात आरबीआय घेराव आंदोलन करण्यात आले. या वेळी माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ नेते भक्तचरण दास, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, नागपूर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी व आमदार सुनील केदार आदी उपस्थित होते. 

या वेळी ऊर्जित पटेल यांच्या राजीनाम्याची कॉंग्रेसच्या सर्वच नेत्यांनी मागणी केली. पृथ्वीराज चव्हाण यांचे भाषण संपल्यानंतर उत्स्फूर्तपणे कॉंग्रेस कार्यकर्ते पोलिसांचे बॅरिकेटस तोडून रिझर्व्ह बॅंकेकडे धाव घेतली. इतकेच नव्हे तर कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावर चढून "ऊर्जित पटेल हाय हाय', "नरेंद्र मोदी मुर्दाबाद'च्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. हा प्रकार जवळपास 15 ते 20 मिनिटे सुरूच होता. कॉंग्रेस कार्यकर्ते अधिक आक्रमक झाल्याने पोलिस व अतिशीघ्र कृती दलाच्या (आरएएफ) जवानांनी कार्यकर्त्यांना पांगाविण्यासाठी जोरदार लाठीमार केला. कार्यकर्ते सैरावैरा पळू लागल्याने जवानांनी धावत जाऊन पकडून त्यांना चांगलेच बदडून काढले. यामुळे काही काळ आरबीआय परिसरात तणावाचे वातावरण झाले होते. संपूर्ण वाहतूक दुसरीकडे वळविण्यात आली. पोलिसांनी अधिक कुमक मागविण्यात आली. 

या लाठीमारात इरशाद अली, प्रकाश साबळे, धीरज पांडे, एनएसयूआयचे शहर अध्यक्ष आमीर लोधी, ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या लीलाबाई म्हैसकर यांच्यासह आठजण जखमी झाले. जखमींना उपचारानंतर सोडून देण्यात आले. 

लाठीमाराची चौकशी व्हावी 
कॉंग्रेस कार्यकर्ते शांततेत आंदोलन करीत असताना विनाकारण पोलिसांनी लाठीमार केला. या लाठीमाराची चौकशी करण्यात यावी व यासाठी जबाबदार पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली. नोटाबंदीच्या विरोधात होणारे आंदोलन दडपून टाकण्यासाठी दिल्लीहून आदेश असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Web Title: Congress workers baton