कॉंग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

वरोरा (चंद्रपूर) : शेतकरी, बेरोजगारांच्या विविध मागण्यांना घेऊन रत्नमाला चौकात गुरुवारी (ता.19) कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी नागपूर-चंद्रपूर मार्गावर टायर जाळून वाहतूक रोखून धरली. त्यामुळे येथे तैनात असलेल्या पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. या आंदोलनामुळे चंद्रपूर-नागपूर मार्गावरील वाहतूक तब्बल चार तास विस्कळीत झाली होती.

वरोरा (चंद्रपूर) : शेतकरी, बेरोजगारांच्या विविध मागण्यांना घेऊन रत्नमाला चौकात गुरुवारी (ता.19) कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी नागपूर-चंद्रपूर मार्गावर टायर जाळून वाहतूक रोखून धरली. त्यामुळे येथे तैनात असलेल्या पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. या आंदोलनामुळे चंद्रपूर-नागपूर मार्गावरील वाहतूक तब्बल चार तास विस्कळीत झाली होती.
अतिवृष्टीमुळे कपाशीची वाढ होऊ शकली नाही. फुलांची संख्या कमी असल्याने बोंडे कमी येतील. त्यामुळे कपाशीच्या उत्पन्नात घट होणार आहे. सोयाबीन पिकावर अतिवृष्टीमुळे अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याने फुले, शेंगा आल्या नसल्याने पिकांचे नुकसान झाले. पिकांचे सर्वेक्षण करून प्रतिहेक्‍टरी 60 हजार रुपये आर्थिक नुकसानभरपाई देण्यात यावी, हंगामी पीककर्ज माफ करावे, अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करावा, आयएसएमटी आणि साई वर्धा पॉवर प्लॅंट कार्यान्वित करण्यात यावा या मागण्यांचे निवेदन दोन दिवसांपूर्वीच खासदार हंसराज अहीर यांनी प्रशासनाला दिले होते. या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, अजूनही मागण्यांवर विचार करण्यात आला नाही. त्यामुळे गुरुवारी (ता. 19) खासदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वात चंद्रपूर-नागपूर मार्गावरील रत्नमाला चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आनंदवन चौकात रस्त्यावर टायरही जाळण्यात आले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत अग्निशमन दलाच्या माध्यमातून आग विझविली.
या आंदोलनात डॉ. आसावरी देवतळे, प्रकाशचंद मुथा, प्रतिभा धानोरकर, देवानंद पवार, डॉ. हेमंत खापणे, सुनंदा जीवतोडे, विलास टिपले, मिलिंद भोयर, भगतसिंग मालसुरे, शिरोमणी स्वामी, संजीवनी भोयर, दिनेश चोखारे, अनिल झोटिंग, छोटू शेख, कन्हैयालाल जयस्वाल, डॉ. विश्‍वास झाडे, आसीफ रजा, मुनाज शेख, दुर्गा ठाकरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश होता. मागण्यांचे निवेदन तहसीलदार सचिन गोसावी यांना देण्यात आले.

शासनाने ओला दुष्काळ जाहीर करीत शेतकऱ्यांना प्रतिहेक्‍टरी 60 हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी. परिसरातील उद्योगधंदे सुरू करून बेरोजगारांचा प्रश्‍न कायमस्वरूपी मिटवावा.
- बाळू धानोरकर, खासदार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress workers on the road