कॉंग्रेसी भ्रष्टाचारी, महाआघाडी "ढकोसला'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 जानेवारी 2019

नागपूर : नेता, नीती, सिद्धांत नसलेल्या कॉंग्रेस पक्षानेच भ्रष्टाचार जन्माला घातला तर महाआघाडी हा "ढकोसला'आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव भूपेंद्र यादव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.

नागपूर : नेता, नीती, सिद्धांत नसलेल्या कॉंग्रेस पक्षानेच भ्रष्टाचार जन्माला घातला तर महाआघाडी हा "ढकोसला'आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव भूपेंद्र यादव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
भारतीय जनता पक्ष, अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय महाअधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी यादव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मोदींच्या नेतृत्वातील सरकारने देशाला परिवार मानून विकासावर भर दिला. दुसरीकडे कॉंग्रेसने परिवारवाद वाढविला. देशातील संवैधानिक संस्थाना मोडीत काढत लोकशाहीला मागे नेण्याचे कार्य केले. भ्रष्टाचाराची जननी असलेल्या कॉंग्रेसचे नेते खोटारटे आरोप करीत आहेत. राफेल मुद्यावरून होणारे आरोप सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले आहे. दुसरीकडे हेरॉल्ड, मल्ल्या-मोदींना कर्ज घेण्यासाठी फोन ही बाब सर्वांनाच माहिती आहे. मोदी, मल्ल्यांसारख्यांना वढणीवर आणण्यासाठी मोंदींच्या नेतृत्वातील सरकारने "भगोडा अपराध कायदा' आणल्याचा दावा भूपेंद्र यादव यांनी केला.
एका व्यक्तीच्या विरोधात हे पक्ष एकत्र येत आहेत. त्यात कोण कुणासोबत आहे हे कुणालाही माहिती नाही. उत्तर प्रदेशात झालेल्या "सप-बसप' या "फार्सिकल' आघाडीने कॉंग्रेसलाच बाहेर केले. अन्य राज्यांमध्येसुद्धा तशीच स्थिती आहे. कोणतेही नेतृत्व नसलेले मजबूर सरकार ते बनवू इच्छित आहेत. दुसरीकडे भाजपला 35 पक्षांचा पाठिंबा मिळत आहे. राममंदिर त्याच ठिकाणी बनावे यावर भाजप ठाम आहे. या विषयावर सर्वोच्च न्यायालयात जलदगतीने सुनावणी होण्यासाठी आग्रही आहे. दुसरीकडे कॉंग्रेस मात्र जाणीवपूर्वक विलंब करीत असल्याचा आरोप यादव यांनी केला. पत्रकार परिषदेला मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद सोनकर, राष्ट्रीय महासचिव प्रा. राजकुमार फुलवानी, चिना रामू, विवेक सोनटक्के, भाजपचे शहराध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे होते.  
भाजपच्या अ. जा. मोर्चाची राष्ट्रीय परिषद आजपासून
भाजपच्या अनुसूचित जाती-जमाती आघाडीच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्‌घाटन शनिवारी (ता. 19) दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वसंतराव देशपांडे सभागृहात होणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष खासदार विनोद सोनकर, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे प्रमुख पाहुणे राहतील. परिषदेला देशभरातील चार हजारांवर प्रतिनिधी हजेरी लावणार आहेत. त्यात भाजपचे अनुसूचित जाती-जमातींचे 46 खासदार तसेच दीडशेवर आमदार हजर राहणार आहेत. दोन दिवसांत होणाऱ्या विविध चर्चासत्रांमध्ये अनेक विषयांवर चर्चा होणार आहे. राष्ट्रीय परिषद यशस्वी करण्यासाठी भाजपने 21 समित्या नियुक्त केल्या आहेत. राष्ट्रीय परिषदेच्या स्थळाला छत्रपती शाहू महाराज समता परिसर असे नाव दिले आहे. 20 जानेवारीला दुपारी तीन वाजता संकल्प सभा कस्तुरचंद पार्कवर होणार आहे. याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार आहेत. शहा यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. परंतु, त्यांच्या कार्यालयाकडून अद्याप जाहीर सभेला उपस्थित राहू शकणार नाही, असे अधिकृतपणे कळविलेले नाही.  
सरकारच्या उपलब्धींवर प्रस्ताव
मोदी सरकारने पाच वर्षांमध्ये अनुसूचित जाती व जमातींच्या विकासासाठी केलेल्या योजनांची माहिती कार्यकर्त्यांना दिली जाणार असल्याची माहिती भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष व नगरसेवक धर्मपाल मेश्राम यांनी दिली. लोकसभा निवडणुका जवळ आल्या असताना देशातील अनुसूचित जातीच्या मतदारांना मोदी सरकारच्या योजनांची माहिती देण्याची आवश्‍यकता आहे. राष्ट्रीय परिषदेला हजर राहणाऱ्या कार्यकर्त्यांना या योजनांची माहिती तसेच विरोधकांच्या अपप्रचाराला उत्तर कसे द्यायचे, याची माहितीही दिली जाणार आहे. अनुसूचित जाती व जमातींना भेडसावत असलेल्या विविध प्रश्‍नांवरसुद्धा चर्चा होणार असल्याचे मेश्राम यांनी सांगितले.

Web Title: Congressional Corrupt, Mahaagadi "Dhakosala"