तेलंगणा, आंध्रातून वणीत गांजाची खेप

file photo
file photo

यवतमाळ : वणीत गेल्या महिनाभरात गांजा जप्तीची दुसऱ्यांदा कारवाई करण्यात आली. अल्पवयीन मुले गांजाचा धूर सोडत असल्याने पालक चिंतित आहेत. तेलंगणा व आंध्र प्रदेशातून वणी येथे गांजाची खेप पोहोचत असल्याची बाब पोलिस तपासात पुढे आली आहे. मुख्य तस्करांच्या मुसक्‍या आवळण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.
यवतमाळ येथून आलिशान वाहनातून वणी शहरात गांजा पोहोचत असल्याची टीप पोलिस अधीक्षकांच्या पथकाला मिळाली. त्यांनी वणी पोलिसांच्या मदतीने वरोरा मार्गावर सापळा रचून दीड लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करून एकाला अटक केली. वणीत ठिकठिकाणी शाळकरी विद्यार्थी सिगारेट पिताना दिसतात. निर्जनस्थळी अल्पवयीन मुले एकत्र येऊन गांजाचा धूर सोडतात. काही दिवसांपूर्वी शास्त्रीनगरातील किराणा दुकानातून गांजा जप्त करण्यात आला होता. वणीत गांजा सेवनाचा विषय गंभीर बनत चालला आहे. एका महाराजाने या व्यवसायात चांगला जम बसविला आहे. नेहमीच्या ठरलेल्या गिऱ्हाइकालाच तो पुड्यातू गांजा विक्री करीत असल्याची माहिती आहे. मात्र, पोलिसांचे हाथ थेट त्याच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. पानटपरीवर कमी दरात एक सिगारेट मिळते. त्यात गांजा भरून विद्यार्थी धूर सोडतात. शहरातील निर्जनस्थळी विद्यार्थ्यांची मैफील बघावयास मिळते. गांजाच्या अतिसेवनामुळे एका विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेलंगणा व आंध्र प्रदेशातून येणारा गांजा बंद करायचा असेल, तर मुख्य तस्करांच्या मुसक्‍या आवळणे गरजेचे आहे. त्यासाठी एक पोलिस पथक मागावर असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.
शाळेत दफ्तर तपासणी
शाळकरी विद्यार्थी व्यसनाच्या आहारी गेल्याने पालक व शिक्षक चिंतित आहेत. उपाययोजना म्हणून वणीतील शाळेत विद्यार्थ्यांची दफ्तर तपासणी सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या संशयास्पद हालचालीदेखील टिपण्यात येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com