राज्यात ६८ वन उद्यानांची निर्मिती सुरू

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 December 2019

राज्यात जैवविविधता वन उद्यानांना गती येणार आहे. शासनाने यासाठी अकोला, वाशीम, बुलडाणा जिल्ह्यांकरिता निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह निसर्गप्रेमींना संधी निर्माण होणार आहे. 

अकोला : स्व.उत्तमराव पाटील वन उद्यान योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दोन ठिकाणी याप्रमाणे 68 उद्यानांची निर्मिती करण्यात येत आहे. या करिता शासनाकडून 5 कोटी 86 लाख 72 हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यात येणार आहे. या निर्णयाने सुरुवातीपासून संथ गतीने सुरू असलेल्या कामांना गती मिळणार आहे. यामुळे वन उद्यानाच्या परिसरातील नजिकच्या गावातील नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, निसर्गप्रेमींना जैवविविधतेचा अनुभव व आनंद घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

स्व. उत्तमराव पाटील वन उद्यान योजनेअंतर्गत राज्यात 856.71 हेक्टर क्षेत्रावर 68 वन उद्यानांची निर्मिती सुरू आहे. सामाजिक वनीकरण विभागांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात दोन वन उद्यानांचे नियोजन यात करण्यात आले आहे. यामध्ये स्थानिक प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. उद्यानांचे काम प्रगतीपथावर असले तरी ही सर्व उद्याने नागरिकांसाठी खुली आहेत. उद्यानाच्या माध्यमातून फळवन, चंपकवन, कदंबवन, अशोकवन, आम्रवन, जंबुवन, वंशवन, मदनवृक्ष वन, चरक वन, लता वन, सारिका वन मगृसंचार वन, अतिथीवन यासारखी विविध प्रकारची उपवने, प्रिय व्यक्तीच्या नावे वृक्षारोपण करून स्मृतिवने निर्माण केली जात आहेत. 

उद्याने पर्यटन स्थळे म्हणून येणार नावारुपास
विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रजाती आणि वन्यजीवांविषयी आस्था निर्माण व्हावी, त्यांचे या गोष्टींकडे लक्ष आकर्षित व्हावे यासाठी त्यांना या उद्यानात अभ्यासाबरोबर क्रीडा-व्यायाम आणि मनोरंजनाची साधने उपलब्ध करून दिली जात आहेत. वृक्ष-लतांचे महत्त्व आणि उपयोगिता सांगणारे पुस्तक संग्रहालय निर्माण करण्याचे व त्याद्वारे या सर्व माहितीचा प्रचार आणि प्रसार करण्याचेही यात नियोजित आहे. अनेक जिल्ह्यातील उद्याने ही पर्यटन स्थळे म्हणून नावारुपास येत आहे.

जैवविविधता अनुभवण्याची संधी
वन जमिनीवरील जैवविविधता अनुभवण्याची संधी मिळणार आहे. या सोबत निसर्गाचे संरक्षणही होणार असल्याने या योजनेला महत्त्‍व प्राप्त झाले आहे. या उद्यानाच्या निर्मितीकरिता अमरावती, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, पुणे या सामाजिक वनवृत्तांसाठी 5 कोटी 86 लाख 72 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे. याकरिता आज शासनाने मान्यता दिली असून, वऱ्हाडातील तिनही जिल्ह्याला 1 कोटी 82 लाख 58 हजार रुपये वितरीत करण्यात येणार आहे.

Image may contain: sky and cloud

  • विभागात वितरीत निधी
  • विभाग निधी(लाखात)
  • बुलडाणा  21 लाख 40 हजार
  • अकोला 1 कोटी 50 लाख 59 हजार
  • वाशीम 10 लाख 59 हजार
  • एकूण 1 कोटी 82 लाख 58 हजार 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Construction of 4 forest parks in the state