मेट्रो भवनाचे बांधकाम अनधिकृत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

नागपूर : मेट्रो भवन 5 हजार 460 चौरस फूट जागेवर उभारणीला नागपूर सुधार प्रन्यासने मंजुरी दिली होती. प्रत्यक्षात 11 हजारांहून अधिक चौरस फूट जागेत अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आले. तसेच अग्निशमन यंत्रणाही उभारली नाही. "कम्प्लायन्स' प्रमाणपत्र घेण्यापूर्वीच या इमारतीत कार्यालय सुरू करण्यात आले असल्याचा थेट आरोप जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

अग्निशमन विभागाने मेट्रो भवनाला पाठविलेल्या नोटीस आणि पाहणी अहवालाचा संदर्भ देत पवार यांनी पुन्हा एकदा मेट्रो प्रशासनावर हल्ला चढविला. मेट्रो प्रशासनाकडून केले जाणारे दावेही खोटे असल्याचे पवार यांनी सप्रमाण दाखवून दिले. बांधकामासाठी कोणत्याही यंत्रणांची परवानगीच घेतली गेली नसल्याचा दावा त्यांनी केला. अग्निशमन विभागाच्या अहवालानुसार अपर ग्राउंड फ्लोअरचे बांधकाम अनधिकृत आहे. नियमानुसार कम्प्लायन्स प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असले तरी पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावर महामेट्रोने कार्यालय सुरू केले असून, ही धोकादायक बाब आहे. तळमजला ते सहाव्या मजल्यापर्यंत कामे सुरू असली तरी अग्निशमन यंत्रणा पूर्णपणे उभारली गेली नाही. या त्रुटी लक्षात घेता अग्निशमन विभागाने तातडीने इमारतीला सील लावावे, अशी मागणी पवार यांनी केली. नियमबाह्य बांधकामासाठी संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी मनपा आयुक्त आणि अग्निशमन विभागाकडे करणार आहोत. त्यांनी पावले न उचलल्यास गुन्हे दाखल करण्यासाठी न्यायालयीन लढा लढणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Construction of Metro Bhawan is unauthorized