बांधकाम सुरू, अस्तरीकरणाला भेगा

रूपेश खंडारे
शनिवार, 18 मे 2019

पारशिवनी  (नागपूर) : पेंच जलाशयाच्या उजव्या कालव्यांच्या वितरिकेच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र हे काम करीत असताना त्याचा बांधकामाचा दर्जा योग्य नसल्याचे समोर आले असून दुरुस्तीदरम्यान करण्यात येणाऱ्या अस्तीकरणाला भेगा पडल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे पुन्हा एकदा "धुशींनी फोडले अस्तरीकरण' असे कारण दिले जाऊ शकते.

पारशिवनी  (नागपूर) : पेंच जलाशयाच्या उजव्या कालव्यांच्या वितरिकेच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र हे काम करीत असताना त्याचा बांधकामाचा दर्जा योग्य नसल्याचे समोर आले असून दुरुस्तीदरम्यान करण्यात येणाऱ्या अस्तीकरणाला भेगा पडल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे पुन्हा एकदा "धुशींनी फोडले अस्तरीकरण' असे कारण दिले जाऊ शकते.
तालुक्‍यातील विविध ठिकाणी कोट्यवधी रुपयांतून कालवे दुरुस्तीचे काम पारशिवनी वितरिकेवर केले जात आहे. सिंचनाकरिता कालवे दुरुस्ती होणे शेतकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. पेंच जलाशयाच्या उजव्या कालव्यावरील पारशिवनी वितरिकेच्या दुरुस्तीचे कंत्राट साडेआठ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या वितरिकेवर महिनाभरापूर्वी लायनिंगचे (पॅसेज) काम करण्यात आले होते. पॅसेज वापरापूर्वी जागोजागी फुटले असून ते उखडायला सुरवात झाली आहे. अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी बांधव तक्रारी करूनही त्यात सुधार होत नसल्याने अधिकारी, कंत्राटदार यांच्या संगनमतानेच कामे होत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.
केवळ एका महिन्याच्या कालावधीत कॉंक्रिटच्या अस्तरीकरणाला भेगा पडल्या आहेत. भविष्यात या भेगा मोठ्या होऊन पाण्याची नासाडी हाईल. याशिवाय योग्य क्‍युरिंग नसल्याने लायनिंग कोलमडण्यास सुरुवात झाली आहे. या कामात लाल मुरुमाच्या जागी वाळुमिश्रीत मातीचा वापर केलेला दिसून येतो. क्‍युरिंगसाठी लागणारे पाणी पेंच जलाशयाच्या कालव्यात जागोजागी बंधारे बांधून जमा केलेले आहे. शेत पिकांकरिता वेळेवर पाणी उपलब्ध करून देण्यात सिंचन विभाग कमी पडतो. मात्र, कंत्राटदाराला लाखो करोडो लिटर पाणी कालव्याच्या क्‍युरिंगकरिता दिले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
शेतकऱ्यांची चिंता वाढली
पेंच जलाशयाच्या कालवे व वितरिकेला अनेक ठिकाणी भगदाड पडल्याने व कालव्याला भेगा पडल्याने पाण्याचा विसर्ग करण्यात येत नव्हता. यामुळे शेतकरी सिंचनापासून वंचित होते. कालव्याच्या दुरुस्ती, सर्व्हिस रोड, अस्तरीकरण, कालव्याच्या काही ठिकाणी पुलांची निमिर्ती अशी अनेक कामे केली जात आहेत. एकीकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कालवे दुरुस्ती होत असल्याने शेतकरी सुखावला होता. मात्र सध्या सुरू असलेली कालवे दुरुस्तीची कामे पाहून शेतकरी चिंतेत आहे. यामुळे पुन्हा एकदा सिंचनाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्‍यता आहे.
अधिकाऱ्यांनी केली पाहणी
पेंच जलाशयाच्या वितरिकेच्या कामाची पाहणी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्‍नांचा भडीमारच केला. जलाशयाच्या पाणी नागपूर शहरवासींना व शेतकऱ्यांना मिळत नाही. मात्र क्‍युरिंगकिरिता ते दिले जात आहे. या वितरिकेची दुरुस्ती करताना निकृष्ठ दर्जाचे काम केले जात असून याची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी शेतकरी संजय व्यास, सागर सायरे, अशोक भेदरे यांनी केली. याकामाकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे असेही मत नोंदविले.

Web Title: Construction news