विद्यापीठात आता कंत्राटी प्राध्यापक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जुलै 2019

अमरावती :  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आता तासिकांऐवजी कंत्राटी पद्धतीने प्राध्यापकांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्रता निकषातही बदल केले जाणार आहेत. यासंदर्भात व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शिक्‍कामोर्तब करण्यात आले.

अमरावती :  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आता तासिकांऐवजी कंत्राटी पद्धतीने प्राध्यापकांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्रता निकषातही बदल केले जाणार आहेत. यासंदर्भात व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शिक्‍कामोर्तब करण्यात आले.
कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी व्यवस्थापन परिषदेची तत्काळ बैठक बोलविली. या बैठकीत सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्राध्यापकाची कंत्राटी भरती. आतापर्यंत विद्यापीठात तासिका तत्त्वावर प्राध्यापक भरती करण्यात येत होती. त्यांची तासिका संपली की, वेतन त्यांना मिळायचे. यात विद्यापीठाचा पैसाही वाचायचा; परंतु विद्यार्थ्यांच्या पैशावर डोळा असलेल्या विद्यापीठातील सत्ताधाऱ्यांनी आता प्राध्यापकांची भरती ही कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना अकरा महिन्यांचे नियुक्‍तिपत्र देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी प्राध्यापकाला दरमहा 24 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. केवळ पदव्युत्तर एवढीच पात्रता विद्यापीठ सत्ताधाऱ्यांनी ठेवली असून एकूण 62 उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. उमेदवारांची नियुक्‍ती ही केवळ एका वर्षातील 11 महिन्यांसाठी असल्याने दरवर्षी भरती केली जाणार आहे. विद्यापीठात आलेला पैसा हा विद्यार्थ्यांच्या पालकांचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या 14 लाख 48 हजार रुपयांचा दरमहा चुराडा होणार असून हा अतिरिक्‍त बोजा विद्यापीठावर पडणार आहे. असे झाल्यास विद्यापीठाला अधिक पैसा जुळवाजुळव करण्यासाठी परीक्षा फीवाढ करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. हा निर्णय अतिशय चुकीचा असल्याचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नीलेश गावंडे यांनी बैठकीत म्हटले होते. या निर्णयाविरोधात व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. दिनेश सूर्यवंशी व प्रा. डॉ. वाडेगावकर यांनी कुलगुरूंकडे विरोध नोंदविला होता. मात्र अन्य सदस्यांनी प्रशासनाच्या पाठीशी उभे राहून पाठिंबा दिला. त्यामुळे या निर्णयाला बळकटी मिळून निर्णय बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: contract professor at amravati university