कंत्राटी प्राध्यापक शिकविणार "फुलटाइम' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विविध विभाग व संलग्नित तीन महाविद्यालयांत कंत्राटी प्राध्यापकांची नियुक्ती तासिका तत्त्वावर केली जाते. मात्र, नव्या सत्रापासून कंत्राटी प्राध्यापकांची नियुक्ती तासिका तत्त्वाऐवजी "फुलटाइम' करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली. 

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विविध विभाग व संलग्नित तीन महाविद्यालयांत कंत्राटी प्राध्यापकांची नियुक्ती तासिका तत्त्वावर केली जाते. मात्र, नव्या सत्रापासून कंत्राटी प्राध्यापकांची नियुक्ती तासिका तत्त्वाऐवजी "फुलटाइम' करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली. 

विद्यापीठात पस्तीसहून अधिक विभाग आणि तीन महाविद्यालयांचा समावेश आहे. यापैकी बऱ्याच विभागांमध्ये तासिका तत्त्वावर कंत्राटी प्राध्यापकांची नियुक्ती केली जाते. महत्त्वाचे म्हणजे बऱ्याच विभागांमध्ये दहा ते पंधरा प्राध्यापक कंत्राटी म्हणून काम करतात. विद्यापीठाच्या तीन महाविद्यालयांचीही स्थिती जवळपास हीच आहे. एलआयटी, बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय आणि बॅरि. एस. के. वानखेडे शिक्षण महाविद्यालयात सर्वाधिक कंत्राटी प्राध्यापकांचा समावेश आहे. 

सेमिस्टर पद्धतीने दोन सत्रांसाठी प्राध्यापकांना नियुक्त करण्यात येते. प्राध्यापकांना तासिकेप्रमाणेच वेतनही दिले जाते. मात्र, तासिका संपताच प्राध्यापक निघून जातात. यानंतर विभाग आणि महाविद्यालये ओस पडल्याचे दिसतात. बरेचदा विद्यार्थी क्‍लासमध्ये दिसून येत नसल्याने प्राध्यापकांच्या तासिका वाया जाते. आता या प्राध्यापकांना "फुलटाइम' "वर्कलोड' देत सहायक प्राध्यापकाचा दर्जा देण्यात येणार आहे. यामुळे प्राध्यापकांची विभाग आणि महाविद्यालयाप्रति जबाबदारी निश्‍चित करण्यात येईल. 

प्रत्येक सेमिस्टरमध्ये प्राध्यापकांची नियुक्ती 
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार महिन्याला 24 हजार रुपये "फिक्‍स पे' देण्यात येणार आहे. यामुळे विद्यापीठाच्या विभागात आणि महाविद्यालयात विद्यार्थ्यांची नियमित हजेरी राहण्यास मदत होईल. प्रत्येक सेमिस्टरमध्ये प्राध्यापकांची नियुक्ती होणार असून, यापैकी चांगल्या प्राध्यापकांना पुढल्या सेमिस्टरसाठीही नियमित करण्यावर विभाग आणि महाविद्यालये भर देतील. 

विद्यापीठाच्या निर्णयामुळे विभागात असलेल्या प्राध्यापकांना कंत्राटी प्राध्यापकांची मदत मिळेल शिवाय विभागातील बऱ्याच प्रमाणात प्राध्यापकांची संख्या दिसून येईल. अभ्यासक्रमांच्या दृष्टिकोनातूनही त्याचा फायदा होईल. 
- डॉ. सिद्धार्थविनायक काणे,  कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ. 

Web Title: Contract professor teaching Fulltime