विकासात्मक बदलात सामील व्हा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

नागपूर -  देशात 666 विद्यापीठे आणि 39 हजार 671 शैक्षणिक संस्थांचे जाळे पसरले आहे. दरवर्षी सुमारे अडीच कोटी विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतात आणि पदवी घेऊन बाहेर पडतात. सुशिक्षित विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करून विकासात्मक बदलात सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय अंतराळ संशोधन संस्थचे (इस्रो) संचालक पद्मश्री ए. एस. किरण कुमार यांनी केले.

नागपूर -  देशात 666 विद्यापीठे आणि 39 हजार 671 शैक्षणिक संस्थांचे जाळे पसरले आहे. दरवर्षी सुमारे अडीच कोटी विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतात आणि पदवी घेऊन बाहेर पडतात. सुशिक्षित विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करून विकासात्मक बदलात सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय अंतराळ संशोधन संस्थचे (इस्रो) संचालक पद्मश्री ए. एस. किरण कुमार यांनी केले.

स्व. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात पार पडलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 103 व्या दीक्षान्त समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे होते. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम, परीक्षा नियंत्रक डॉ. नीरज खटी, बीसीयूडी संचालक डॉ. डी. के. अग्रवाल, डॉ. मिलिंद बाराहाते, उच्च व तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. गुलाबराव ठाकरे, वित्त अधिकारी राजू हिवसे उपस्थित होते.

एखाद्या विषयात पदवी प्राप्त करणे केवळ शैक्षणिकच नव्हे, तर विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व विकासाचे द्योतक आहे. यामध्ये शिक्षक व पालकांचा मोठा वाटा आहे. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच यशप्राप्तीचा मार्ग सुकर होतो, असेही ए. एस. किरण कुमार म्हणाले. प्रास्ताविक कुलगुरू डॉ. काणे यांनी केले.

जगातील उपग्रहांची मोठी साखळी
भारताने अंतराळ संशोधनात जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. जगातील सर्वांत मोठी उपग्रहांची साखळी निर्माण करण्यात आपल्याला यश आले आहे. त्यातूनच इंटरनेट, टेलिव्हिजन ब्रॉडकॉस्टिंग, रेडिओ नेटवर्किंग, आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रांत मोठी प्रगती झाली आहे. अलीकडेच अंतराळात सोडलेल्या "जीसॅट-18' उपग्रहाला एकूण 48 "कम्युनिकेशन ट्रान्सपॉंडर' जोडण्यात आलेले आहेत. सद्य:स्थितीत असलेल्या संवाद तंत्रज्ञानामध्ये अधिक सुस्पष्टता येणास मदत होणार आहे, अशी माहिती किरण कुमार यांनी दिली.

उमेकर दाम्पत्याला पीएच.डी.
डॉ. मिलिंद उमेकर व नीलजा उमेकर या दाम्पत्याला पीएच.डी.ने सन्मानित करण्यात आले. किशोरीताई भोयर फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद उमेकर यांची ही दुसरी पीएच.डी. आहे. यापूर्वी त्यांनी औषधनिर्माणशास्त्र विषयात पीएच.डी. केली आहे. या वेळी त्यांनी व्यवस्थापन अभ्यासक्रमातून "टोटल क्वॉलिटी मॅनेजमेंट ऑफ फार्मसी एज्युकेशन' या विषयावर पीएच.डी. पूर्ण केली. याशिवाय, स्वामी अवधेशानंद स्कूलमध्ये मुख्याध्यापिका असलेल्या त्यांच्या पत्नी नीलजा यांनी फाइन आर्टमधून "माइंड ऍण्ड आर्ट ऑफ सलमान रश्‍दी' या विषयावर पीएच.डी. पूर्ण केली.

842 पीएच.डी. व 171 विद्यार्थी पदकाने सन्मानित
पद्मश्री ए. एस. किरण कुमार यांच्या हस्ते पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या 64 हजार 459 पदवी, 842 पीएच.डी., दोन डी.लिट. प्रदान करण्यात आल्यात. यात डॉ. जयंत पांडुरंग मोडक यांना अभियांत्रिकी व तांत्रिक शाखेतून, तर डॉ. सतीश चतुर्वेदी यांना समाजविज्ञान शाखेतून डी.लिट. (डॉक्‍टर ऑफ लेटर्स) यांचा समावेश आहे. याशिवाय, 171 प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना 305 सुवर्ण, 42 रौप्य, 99 पारितोषिके अशी एकूण 446 पदके आणि पारितोषिके प्रदान करण्यात आली. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातील (मुख्य शाखा) एलएलबीची (पाच वर्षीय अभ्यासक्रम) विद्यार्थिनी क्रिष्णी ध्रुवकुमार त्रिवेदीला सर्वाधिक 15 पदके मिळाली. शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील बीएस्सीतील विद्यार्थिनी आकांक्षा दीपक चुन्हे, नटवरलाल माणिकलाल दलाल कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या एलएलबी अभ्यासक्रमातील विद्यार्थिनी गरिमा दिनेश शर्मा, मॉरिस कॉलेजची नेहा आफरीन ताज मोहम्मत यांना एम.ए. (इतिहास) अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी 11 पदके मिळाली. आर. एस. मुंडले धरमपेठ कला वाणिज्य महाविद्यालयाचा रवींद्र दशरथ पवारला एम.ए. (मराठी) या अभ्यासक्रमात नऊ पदके मिळाली आहेत. सर्वाधिक 16 हजार 146 पदव्या वाणिज्य शाखेतून, तर सर्वांत कमी 655 पदव्या गृहविज्ञान शाखेतून देण्यात आल्या.

Web Title: convocation ceremony