Video : कुलींच्या मदतीने सक्षमचे अधिवेशन यशस्वी 

राघवेंद्र टोकेकर 
सोमवार, 16 डिसेंबर 2019

सक्षम संस्थेने रविवारी प्रथमच दिव्यांग व दृष्टीहिनांचे पहिले अधिवेशन रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात आयोजित केले होते. अधिवेशनात दिव्यांगांचा अधिकार कायदा 2016 नुसार दिव्यांगांना शासकीय योजना त्वरित लागू कराव्या. यासंदर्भात कायद्याचा अधिकाधिक दिव्यांगांना फायदा व्हावा यासाठी शासकीय अधिकारी व कार्यालयांना त्वरित प्रशिक्षित करावे आदी प्रस्ताव मांडण्यात आले. 

नागपूर : समाजसेवेला धर्म नसतो, मग त्यासाठी मागे का राहायचे? असा विचार करणाऱ्या तीन कुलींनी सक्षमच्या अधिवेशनासाठी रविवराच्या उत्पन्नावर पाणी सोडण्याची तयारी दर्शवली. अन्‌ संपूर्ण दिवस अधिवेशनात सहभागी झालेल्या दिव्यांगांच्या सेवेत घालवला. अब्दुल मजीद, शकील खान आणि उस्मान खान अशी तिघांची नावे असून, सेवाधर्माचे कौतुक म्हणून सक्षमने या तिघांचा सत्कार केला. 

सक्षम संस्थेने रविवारी प्रथमच दिव्यांग व दृष्टीहिनांचे पहिले अधिवेशन रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात आयोजित केले होते. दिव्यांगांसाठी असलेल्या शासकीय योजना, दिव्यांगांचा अधिकार कायदा, स्वयं मूल्यांकन, दिव्यांग प्रकोष्ठ संकल्पना व रोजगार या विषयावर जनजागृती व्हावा या दृष्टनी आयोजित केलेल्या या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. 

विशेष म्हणजे या उपक्रमाला दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. या बांधवांच्या सुखसोयींसाठी संस्थेने व्हिलचेअरची व्यवस्था केली होती. मात्र, या व्हिलचेअर्स ओढण्याचे तंत्र प्रशिक्षित व्यक्‍तीनेच हाताळावे यासाठी रेल्वेस्थानकार काम करणाऱ्या रेल्वे कुली कल्याणकारी सेवा संस्थेला सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली. विशेष म्हणजे सक्षमच्या विनंतीला मान देऊन रेल्वेस्थानकावरील कुली बांधवांनी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. अधिवेशनात हे तीन बांधव पूर्णवेळ उपस्थित होते अन्‌ प्रेत्येकाच्या सेवेसाठी तत्परही होते. 

सविस्तर वाचा - अशोक चव्हाण म्हणतात, राहुल गांधींची भाजपकडून बदनामी

मांडले विविध प्रस्ताव

अधिवेशनात दिव्यांगांचा अधिकार कायदा 2016 नुसार दिव्यांगांना शासकीय योजना त्वरित लागू कराव्या. यासंदर्भात कायद्याचा अधिकाधिक दिव्यांगांना फायदा व्हावा यासाठी शासकीय अधिकारी व कार्यालयांना त्वरित प्रशिक्षित करावे, स्वावलंबन कार्डची स्वीकार्यता निश्‍चित करण्यासाठी संबंधित कार्यालयांना आदेश द्यावे, अस्थिबाधित व श्रवणबाधित दिव्यांगांना ड्रायव्हिंग लायसेन्स प्रदान करणारे केंद्र शहरात सुरू करावे, दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा देताना रायटरचा पर्याय देणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावे, क्रीडांगणांमध्ये दिव्यांगांसाठी काही भाग चिन्हित करून तो त्यांना वापरण्यासाठी उपलब्ध करून द्यावा असे प्रस्ताव मांडण्यात आले. 

अधिक माहितीसाठी - चिमुकलीला अंधारात बांधून तो झाला मोकळा

विश्‍वास वाटला म्हणून आलो 
आम्ही सक्षमचे कार्य जाणून घेतले. हेतू आवडला. आम्हाला योगदान देता येईल असा विश्‍वास वाटला म्हणून एका दिवसाचे उत्पन्न सोडून या कार्यात सहभागी झालो. 
- अब्दुल मजीद


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coolie help saksham