कोरोना इफेक्‍ट : दुर्गम गावातील नागरिकांनीही उचलले हे पाऊल...रस्त्यावर बैलबंड्या केल्या आडव्या

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 March 2020

भामरागड तालुक्‍यातील दुब्बागुडा येथील नागरिकांनी गावातील मुख्य रस्त्यावर बैलबंडी आडवी करून बाहेरून गावात येणाऱ्या अन्य व्यक्तींना मज्जाव केला आहे. यासंदर्भात त्यांनी बॅनर लावून सूचना केल्या आहेत. कोरोनाच्या धास्तीमुळे त्यांनी हे पाऊल उचलले.

गडचिरोली : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासनाकडून सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, आपल्या आरोग्याबाबत नक्षलग्रस्त भागातील आदिवासीही मागे राहिले नाहीत. दुब्बागुडाच्या ग्रामस्थांनी बाहेरच्या लोकांना गावबंदी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांनीही जनता कर्फ्यूला उस्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्ह्याच्या सर्वच भागात रस्त्यावर नागरिकांचा शुकशुकाट दिसून आला. शासन आणि प्रशासनाने केलेल्या आवाहनाला व्यापारी संघटनांनीही साथ दिली. यामुळे रविवारी (ता. 22) दिवसभर बाजारपेठ बंद होत्या.

तेलंगणाच्या सीमेलगत चोख बंदोबस्त

जिल्हा पोलिस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून तेलंगणा राज्याच्या सीमेलगत चोख बंदोबस्त लावला होता. त्यामुळे तेलंगणा राज्यातून एकही वाहन गडचिरोलीत फिरकले नाही. जनता कर्फ्यूची वेळ संपल्यानंतर शहरासोबतच ग्रामीण भागातही लोकांनी सायंकाळी आपापल्या घराच्या छतावर उभे राहून टाळ्या वाजवून कर्तव्यात व्यस्त असलेल्या कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

जिल्हाधिकाऱ्यांनी मानले आभार

सकाळी दारावर थाप मारणारे, वृत्तपत्र विक्रेते वगळता दूध, दही व भाजी विक्रेत्यांनीही "जनता कर्फ्यू'त सहभागी होऊन आपले कर्तव्य बजावले. सरकारच्या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्ह्यातील नागरिकांचे आभार मानले.

हेही वाचा : धडाडत जात होती तेलंगणा एक्सप्रेस अन् अचानक घडला हा प्रकार...

सर्वांनाच केली गावबंदी

भामरागड तालुक्‍यातील दुब्बागुडा या आदिवासी गावातील नागरिकांनीही कोरोनाची धास्ती घेतली आहे. यावर खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामस्थांनी गावात येणाऱ्या एका रस्त्यावर दोन बैलबंडी आडव्या केल्या. त्यावर एक बॅनर लावून गावात प्रवेश करण्यापूर्वी बाहेरच्या लोकांनी आधी गाव प्रमुखाची परवानगी घ्यावी, अशी सूचना लिहिली. त्यानंतर सर्वांनाच गावबंदी केली आहे. त्यामुळे फिरते दुकानदार, ऑइस्क्रीम विक्रेते, कपडे विक्रेते तसेच संबंधित नातेवाइकांची गोची झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona effect: the villagers prohibited to give entry to the strangers