file photo
file photo

आनंदवार्ता : कोरोनामुळे मेळघाटात बालमृत्यूत आली घट...आदिवासींचे स्थलांतर थांबल्याने झाला लाभ

अमरावती : एकीकडे कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे व नैराश्‍याचे वातावरण तयार झाले असतानाच आता या आजाराची दुसरी सकारात्मक बाजू समोर आली आहे. कोरोना तसेच लॉकडाउनमुळे यंदा मेळघाटातील आदिवासी बांधवांचे स्थलांतरच झाले नाही. त्यामुळे गर्भवती माता, स्तनदा माता तसेच ० ते ६ वयोगटातील चिमुकल्यांना गावातच पोषणाहार व उपचार मिळत आहे.

त्याचा परिणाम म्हणून यंदा बालमृत्यूत घट झाल्याची माहिती समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या मते मागील वर्षीच्या तुलनेने बालमृत्यूच्या संख्येत घट झाली आहे.

स्थलांतर थांबल्याने झाला लाभ

होळीचा सण आदिवासी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण मानला जातो. होळीपूर्वीच स्थलांतरित होणारी आदिवासी कुटुंबे मेळघाटात परतायला लागतात. होळी संपल्यानंतर पुन्हा मार्चपासून आदिवासी कुटुंबांचे स्थलांतर सुरू होते. त्यामुळे गर्भवती माता, स्तनदा मात आणि शून्य ते सहा वर्षे वयोगटातील चिमुकल्यांची चांगलीच परवड होते. त्यांना अन्य जिल्ह्यांत गेल्यानंतर पोषणाहार तसेच योग्य उपचार मिळत नाहीत. ज्यावेळी ते गावात परत येतात, त्यावेळी या वयोगटातील बालके अतितीव्र कुपोषित श्रेणीत असतात आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. गर्भवती महिलांनासुद्धा वेळीच उपचार मिळत नाहीत.

योग्य पोषणाहाराचा बालकांना लाभ

यंदा मार्चपासूनच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला आणि लॉकडाउन सुरू करण्यात आले. जवळपास जुलैपर्यंत वाहतूक व अन्य व्यवसाय ठप्प असल्याने स्थानिक आदिवासी बांधवांना गावात थांबण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. पर्यायाने बालकांना गावातच अंगणवाड्यांमधून पोषणाहार तसेच औषधोपचार मिळाला. गर्भवती मातांनासुद्धा पोषणाहार देण्यात आला. त्याचा परिणाम बालमृत्यू रोखण्यात झाला.


३२३ गावांमध्ये सुदृढ आरोग्य अभियान
लॉकडाउनच्या काळातसुद्धा मेळघाटातील ३२३ गावांमध्ये सुदृढ आरोग्य अभियान राबविण्यात आले. त्याअंतर्गत केवळ १० दिवसांतच ३ हजार ७८८ मातांची व ३४ हजार ६४ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यासाठी वैद्यकीय अधिकारी, परिचारिकांची चमू तयार करण्यात आली होती. त्यामुळे यंदा बालमृत्यूमध्ये घट आली आहे.
- डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी. जि. प. अमरावती.


आकडे बोलतात ( बालमृत्यू )

  • २०१९-२० : ६५
  • २०२०-२१ : ४६ (वयोगट ० ते ६ )

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com