मनपा आवारातच उघड्यावर लघुशंका

मनपा आवारातच उघड्यावर लघुशंका

नागपूर : शहरात सार्वजनिक ठिकाणी लघुशंका तसेच थुंकणाऱ्यांवर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे कारवाई केली जात आहे. मात्र, महापालिकेचे केंद्रीय कार्यालय परिसरही सुरक्षित नसल्याचे चित्र आहे. मनपा आवारात उघड्यावर लघुशंका व थुंकणाऱ्या 110 जणांवर दंड ठोठावण्यात आला. गेल्या दोन वर्षांत शहराच्या विविध भागांत 2384 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 
उघड्यावर थुंकणे तसेच लघुशंका करणाऱ्यांविरुद्ध महापालिकेने कारवाई तीव्र केली आहे. यासाठी महापालिकेने उपद्रव शोध पथक तैनात केले आहे. झोन स्तरावर पथकाची नेमणूक करण्यात आली असून यात 87 जणांचा समावेश आहे. मनपा आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे स्कॉड लीडर वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात पथकाद्वारे कारवाई सुरू आहे. दहाही झोनमधील पथकाद्वारे 11 डिसेंबर 2017 ते 10 ऑक्‍टोबर 2019 या दोन वर्षांत उघड्यावर लघुशंका व थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, सिव्हिल लाइन्स येथील मनपा मुख्यालय परिसरातही उपद्रव शोध पथकाद्वारे उघड्यावर लघवी व थुंकणाऱ्या 110 जणांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला आहे. उपद्रव शोध पथकाने दोन वर्षांत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 1052 जणांवर कारवाई करीत 95 हजार 800 रुपये दंड वसूल केला. उघड्यावर लघुशंका करणाऱ्या 1332 जणांकडून 2 लाख 9 हजार 700 रुपये दंड वसूल करण्यात आला. दोन्ही कारवाईमध्ये एकूण 2,384 जणांवर 3 लाख 5 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. 
हनुमाननगर झोनमध्ये थुंकणारे सर्वाधिक 
सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या सर्वाधिक 289 जणांवर कारवाई करण्यात आली. यापाठोपाठ लक्ष्मीनगर झोनमध्ये 159, गांधीबाग झोनमध्ये 117, धरमपेठ झोनमधील 115, आसीनगर झोनमध्ये 95, लकडगंज झोनमधील 91, धंतोली झोनमध्ये 87, मंगळवारी झोनमधील 62, नेहरूनगर झोनमधील 27 व सतरंजीपुरा झोनमधील 10 जणांवर कारवाई करण्यात आली. 
लघुशंकेमुळे गांधीबाग, लक्ष्मीनगर बदनाम 
लक्ष्मीनगर व गांधीबाग झोनमध्ये उघड्यावर लघुशंका करणाऱ्या प्रत्येकी 255 जणांवर कारवाई करण्यात आली. या पाठोपाठ धंतोलीमध्ये 210, मंगळवारीमध्ये 149, धरमपेठ व लकडगंजमध्ये प्रत्येकी 114, आसीनगरमध्ये 108, हनुमाननगरमध्ये 71, नेहरूनगरमध्ये 45 व सतरंजीपुरा झोनमध्ये 11 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com