Maharashtra vidhansabha 2019 : नगरसेवकांना लागले आमदारकीचे वेध 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

नागपूर : नगरसेवक ते आमदारपदापर्यंत प्रवास करणारे अनेक जण शहरात आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेत शुक्रवारी सात नगरसेवकांनी उमेदवारीचा अर्ज दाखल केला. यातील बंटी शेळके व पुरुषोत्तम हजारे कॉंग्रेसचे प्रमुख उमेदवार असून, इतर नगरसेवकांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करीत रंगतदार लढतीचे संकेत दिले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसानंतर यातील किती रिंगणात कायम राहतील यावरून सोमवारी पडदा उठणार असला तरी आमदारकीचे त्यांनाही वेध लागल्याचे दिसून येत आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नगरसेवकांनीही जिल्हाधिकारी कार्यालय गाठून विधानसभेत पोहोचण्याच्या स्पर्धेत सहभाग घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही महापौर असताना आमदार झाले. नगरसेवक ते आमदार असा प्रवास करणाऱ्यांच्या यादीत कृष्णा खोपडे, सुधाकर कोहळे, डॉ. परिणय फुके, विकास कुंभारे, प्रा. अनिल सोले, नाना श्‍यामकुळे यांचा समावेश आहे. शहर कॉंग्रेस अध्यक्ष विकास ठाकरेही नगरसेवक असताना विधानसभेच्या रिंगणात होते. प्रफुल्ल गुडधे पाटील यांनीही मागील निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे आव्हान उभे केले होते. 
आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात नगरसेवकांनी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले होते. यातील सात जण उमेदवारी अर्ज दाखल करण्यापर्यंत मजल गाठू शकले. शुक्रवारी कॉंग्रेसतर्फे नगरसेवक पुरुषोत्तम हजारे यांनी पूर्व नागपुरातून उमेदवारी अर्ज दाखल केला. गुरुवारी मध्य नागपुरातून नगरसेवक बंटी शेळके यांनी कॉंग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. कॉंग्रेसने केवळ दोन नगरसेवकांना उमेदवारी दिली. भाजपचे नगरसेवक सतीश होले यांनी दक्षिण नागपुरात पक्षाच्या प्रमुख उमेदवाराविरुद्ध गुरुवारी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. शुक्रवारी दक्षिण नागपुरातून शिवसेनेचे नगरसेवक किशोर कुमेरिया यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. 
पूर्व नागपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक दुनेश्‍वर पेठे, नगरसेविका आभा पांडे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. उत्तर नागपुरातून बसप नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. यातील काही नगरसेवक उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्‍यता आहे. मात्र, कॉंग्रेसतर्फे पूर्व व मध्य नागपुरातून अर्ज दाखल करणारे पुरुषोत्तम हजारे व बंटी शेळके निवडणुकीत कायम राहणार असून, लढतीत रंगत आणणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corporator is dreaming of MLA