कॉटन मार्केटमध्ये 30 दुकानांची राख

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

नागपूर - शहराच्या मध्यवर्ती भागातील वर्दळीच्या कॉटन मार्केट परिसरातील भाजीबाजारात शनिवारी सायंकाळी लागलेल्या भीषण आगीत 30 दुकाने जळून राख झाली. सुमारे साडेतीन तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत लाखोंचा भाजीपाला स्वाहा झाला असून, मोकळे मैदान दिसून येत आहे. सायंकाळी नागरिकांची वर्दळ नव्हती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

फुले मार्केटच्या मागील भागातील भाजी खरेदी-विक्री करणाऱ्यांच्या दुकानांना पावणेपाच वाजताच्या सुमारास आग लागली. मनोज पाटील यांच्या दुकानाला सर्वप्रथम आग लागली. पाचच मिनिटांत आगीने आजूबाजूची पाच दुकाने कवेत घेतली. दरम्यान रवी गौर यांनी अग्निशमन विभागाला आगीची माहिती दिली. अग्निशमन विभागाच्या सहा केंद्रांसह सिव्हिल लाइन व गंजीपेठ येथून पाण्याचे बंब पाठविण्यात आले. पाण्याचे बंब घटनास्थळी पोहोचण्यासाठी 20 मिनिटांचा कालावधी लागला. यादरम्यान जोरदार हवेमुळे आगीने येथील 30 दुकाने कवेत घेतली. एकाच वेळी 30 दुकानांनी पेट घेतल्याने आगीचा धूर दूरपर्यंत दिसून येत होता. या परिसरात कांदा, आलूसह भाजीविक्रेत्यांची दुकाने आहेत. सायंकाळी भाजी मार्केट बंदमध्ये भाजीपाला खरेदीदारांची वर्दळ नव्हती. त्यामुळे नागरिक बचावले. मात्र, विक्रीसाठी आणलेला दुकानांतील मोठ्या प्रमाणातील कांदा, आलूसह भाजीपाला जळून स्वाहा झाला. अग्निशमन विभागाच्या जवानांनी येताच पाण्याचा मारा केला. परंतु येथील बहुतेक दुकाने ताट्या, लाकडांनी तयार करण्यात आल्याने आगीने क्षणातच रौद्ररूप धारण केले. त्यामुळे जवानांना आगी नियंत्रण मिळविण्यासाठी साडेतीन तास लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी रवी गौर यांनी सांगितले. दुरूनच आगीच्या ज्वाळा दिसत असल्याने येथे बघ्यांचीही मोठी गर्दी झाली. या आगीत कॉंग्रेस नेते शेख हुसेन यांचेही दुकाने जळून खाक झाले. आग धुमसत असल्याने रात्री नऊ वाजतापर्यंत विझविण्याचे काम सुरू होते. या आगीत प्राथमिकरीत्या लाखो रुपयांचा माल जळून स्वाहा झाल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले.

Web Title: cotton market fire