देशातील कापूस उत्पादन 13.6 टक्क्यांनी वाढणार!

अनुप ताले
रविवार, 15 डिसेंबर 2019

गेल्या हंगामात कापसाला चांगला दर मिळाला होता. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी यंदा अधिक क्षेत्रावर कापूस लागवड केली असून, कापूस क्षेत्र वाढल्याने अधिक उत्पादन मिळणार असल्याचे संकेत देत, यावर्षी देशात 354.50 गाठीचे कापूस उत्पादन होणार असल्याचा अंदाज काॅटन असोसिएशन आॅफ इंडियाने जाहीर केला आहे.

अकोला : पीक क्षेत्र वाढल्याने यंदाच्या हंगामात देशातील कापूस उत्पादन 13.6 टक्यांनी वाढून ते 354.50 लाख गाठींवर (एक लाख 170 किलो) पोहोचेल, असा अंदाज काॅटन असोसिएशन आॅफ इंडियाने (सीएआय) व्यक्त केला आहे.

गेल्या वर्षी देशात 312 लाख गाठी उत्पादन झाले होते. त्यात यंदा 42.5 लाख गाठींची वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात कापसाला चांगला दर मिळाला होता. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी यंदा अधिक क्षेत्रावर कापूस लागवड केली. कापूस क्षेत्र वाढल्याने अधिक उत्पादन मिळणार असल्याचे संकेत देण्यात आले असून, कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या (सीएआय) पीक समितीच्या 9 डिसेंबर 2019 रोजी झालेल्या बैठकीत 2019-20 कापूस हंगामातील आवक, पुरवठा व उत्पादनाचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने गुलाबी बोंडअळीच्या प्रादूर्भावामुळे तसेच अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाल्याने गुजरात, महाराष्ट्रात अपेक्षेच्या तुलनेत उत्पादकता कमी राहणार असल्याचे ‘सीएआय’ने नमूद केले आहे. तरी सुद्धा जाहीर अंजाजात गेल्या वर्षिच्या तुलनेत 13 लाख गाठींचे अधिक कापूस उत्पादन महाराष्ट्रात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

असे राहील देशाचे उत्पादन
देशात सर्वाधिक कापूस उत्पादन मध्य भागात 195 गाठी होणार असून, त्यामध्ये सर्वाधिक गुजरात 96 लाख गाठी तर, महाराष्ट्र 83 लाख गाठी उत्पादन राहील. त्यानंतर दक्षिण भागात 91.50 लाख गाठी, उत्तर भागात 63 लाख गाठी, असे एकूण 354.50 लाख गाठीचे उत्पादन या हंगामात होणार असल्याची शक्यता कॉटन असोसिएशन आॅफ इंडियाने व्यक्त केली आहे.

सीसीआयच्या सहभागामुळे महाराष्ट्राला फायदा
गतवर्षीपर्यंत महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कापूस लगतच्या राज्यात जात होता. यंदा मात्र बाजारात सीसीआयने सहभाग घेतल्याने, महाराष्ट्रातील उत्पादन बाहेर जाण्याची शक्यात कमी झाली नसून, राज्याचे उत्पादनात तीन लाख गाठींनी वाढणार असल्याचा अंदाज कॉटन असोसिएशन आॅफ इंडियाने व्यक्त केला आहे.

30 सप्टेंबर 2020 पर्यंत 403 गाठींचा पुरवठा
सीएआयने अंदाजित केलेल्या वार्षिक ताळेबंदात कापूस हंगामाच्या शेवटी, म्हणजे 30 सप्टेंबर 2020 पर्यंत 170 किलो वजनाच्या 403 लाख गाठींच्या कापूस पुरवठ्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कापूस हंगामाच्या सुरूवातीस 23.50 लाख गासडींचा ओपनिंग स्टॉक असून, सीएआयने अंदाजे 25 लाख गाठी आयात केली आहे. जे की मागील वर्षीच्या 32 लाख गाठींच्या तुलनेत 7 लाख गाठींनी कमी आहे.

नोव्हेंबर अखेरपर्यंत 57.37 लाख गाठींची आवक
देशातील विविध कापूस उत्पादक राज्यांत 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत 57.37 लाख गाठी कापसाची आवक झाली आहे. त्यामध्ये उत्तर भागात 18.19 लाख गाठी, मध्य भागात 23.81 लाख गाठी, दक्षिणेकडील राज्यांत 14.05 लाख गाठी कापसाची आवक झाल्याची माहिती ‘सीएआय’ने दिली आहे.

अतिवृष्टी, गुलाबी बोंडअळीचा गुजरातला फटका
सर्वाधिक कापूस उत्पादन घेणाऱ्या गुजरातला यंदा अतिवृष्टी आणि गुलाबी बोंडअळीचा मोठा फटका बसला असून, त्यामुळे राज्यातील कापूस उत्पादन चार लाख गाठींनी घटणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच जवळपास 10 टक्के कापूस उत्पादकांनी कापसाचे पीक उपटून इतर पीक घेण्यास सुरुवात केली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cotton production in the India will increase by 13.6 percent !