कापूस हंगामही हातून जाणार!

अनुप ताले
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

- उत्पादनासोबतच गुणवत्तेलाही मोठा फटका
- सोयाबीन डागाळल्यानंतर कापसाचे उत्पादन आणि धाग्याची लांबीही घटणार
- 50 टक्के खरीप उत्पादनात घट
- ​अपेक्षांवर पाणी फिरले

अकोला : तब्बल तीन महिने पावसाने घातलेल्या थैमानात पीक उत्पादनासोबतच गुणवत्तेलाही मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे जवळपास 70 ते 80 टक्के सोयाबीन उद्‍ध्वस्त झाले आहे तर, हाती आलेले पीक सुद्धा डागाळलेले असून, कापसाचे उत्पादन आणि धाग्याची लांबी सुद्धा घटण्याची शक्यता आहे.
दुष्काळ, कीडींचा प्रादूर्भाव आणि शेतमालाच्या पडलेल्या दरांमुळे सलग तीन वर्षांपासून सोयाबीन तसेच कापूस उत्पादकांच्या पदरी घोर निराशा येत आहे. 2017-18 साली कीडींच्या प्रचंड प्रादूर्भावासह गुलाबी बोंडअळीने जवळपास 60 टक्के सोयाबीन आणि 90 टक्के कापूस उत्पादनाचे नुकसान केले. 2018-19 मध्ये गुलाबी बोंडअळीसह इतर कीडींवर सुद्धा शेतकऱ्यांनी योग्य नियोजन व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून नियंत्रण मिळविले. मात्र दुष्काळ स्थितीमुळे जवळपास 50 टक्के खरीप उत्पादनात घट झाली.

अपेक्षांवर पाणी फिरले
हवामान तज्ज्ञांनी वर्तविलेल्या, योग्यवेळी मॉन्सून आगमनासोबतच पोषक पावसाच्या अंदाजामुळे 2019-20 हे वर्ष तरी शेतकऱ्यांना लाभाचे ठरेल, अशी अपेक्षा केली जात होती. मात्र समुद्री वादळांनी शेतकऱ्यांच्या सर्व अपेक्षांवर पाणी फेरले आणि आॅगस्ट ते आॅक्टोबर अशी तब्बल तीन महिने पावसाने सतत झोडपून काढत, मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी उत्पादन होत्याचे नव्हते केले. हमीभावात वाढ आणि मागणी अधिक असल्याने यंदा लवकर हाती येणाऱ्या कडधान्य पिकांचा पेरा वाढला. मात्र त्यापैकी ९० ते ९५ टक्के क्षेत्रावरील मूग, उडीद शेतातच नष्ट झाल्याने, शेतकऱ्यांच्या घरात हे पीक पोहचलेच नाही. सर्वाधिक पेरणी क्षेत्र असलेल्या सोयाबीन पिकाचेही अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन, जवळपास  70 ते 80  टक्के उत्पादन घटले आणि जे उत्पादन शेतकऱ्याच्या हाती लागले, ते सुद्धा डागाळलेले, सडके असल्याने त्याला मातीमोल भाव मिळत आहे.

कापसाचे पीक तरी शेतकऱ्यांना तारेल, असे वाटत होते मात्र, अतिवृष्टीचा दुष्परीणाम डौलदार कपाशीवर होऊन, बोंडं सडणे, पातेगळ, पानेगळ, पिके जळणे आदी लक्षणे दिसत आहेत. यामुळे कापूस उत्पादनात सुद्धा घट येणार असून, कापसाच्या गुणवत्तेवरही मोठा परिणाम होऊन आखूड धाग्याचे पीक शेतकऱ्यांच्या हाती येण्याची शक्यता कृषी अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

काहीही भाव द्या, फक्त शेतमाल घ्या!
ज्यांनी वेळीच सोयाबीन काढून घरी नेले, अशा पाच ते दहा टक्केच शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण पीक हाती लागले. त्यानंतर सततच्या पावसामुळे शेतकरी सोयाबीन काढूच शकले नसल्याने, शेतातच पीक खराब झाले. शेंगा सडल्या तर, दाने काळवंडले. असा माल खरेदी करण्यासाठी व्यापारी सुद्धा टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे काहीही भाव द्या, फक्त आमचा शेतमाल खरेदी करा, अशी मागणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

अतिवृष्टीमुळे यंदा जवळपास 30 ते  40 टक्के कापूस उत्पादन घटण्याची शक्यता आहे. मजूरीचे दर वाढत असून, वेचा मोठ्या फरकाने कमी झाला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यंदा कापसाची गुणवत्ता सुद्धा घसरली असून, त्याचा परिणाम कापसाच्या दरावर होण्याची शक्यता आहे.
- गणेश श्यामराव नानोटे,
प्रगतशील कापूस उत्पादक शेतकरी, बार्शीटाकळी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cotton season will be gone too!