esakal | यवतमाळमध्ये फक्त तीनच केंद्रांवर 'पणन'कडून कापूस खरेदी
sakal

बोलून बातमी शोधा

cotton selling on only three centers of panan mahasangh in yavatmal

दरवर्षी जिल्ह्यात पणन महासंघ जवळपास सात खरेदी केंद्र सुरू करते. यंदा मनुष्यबळाअभावी केंद्र कमी करण्याचा निर्णय महासंघाने घेतला आहे. त्यामुळे यंदा राज्यातील केंद्रांची संख्या कमी केली आहे.

यवतमाळमध्ये फक्त तीनच केंद्रांवर 'पणन'कडून कापूस खरेदी

sakal_logo
By
चेतन देशमुख

यवतमाळ : गेल्या हंगामात कर्मचाऱ्यांअभावी पणन महासंघांची कापूस खरेदी करताना चांगलीच तारांबळ उडाली होती. त्यामुळेच यंदा पणन महासंघाने केंद्र घटविण्याचा निर्णय घेतला. त्याचा फटका जिल्ह्याला बसणार असून, यवतमाळ विभागात केवळ तीन खरेदी केंद्र राहणार असल्याचे पणन महासंघाने जाहीर केले आहे. त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांवर या तालुक्‍यांतून शेतमाल दुसऱ्या तालुक्‍यात नेण्याची वेळ येणार आहे.

दरवर्षी जिल्ह्यात पणन महासंघ जवळपास सात खरेदी केंद्र सुरू करते. यंदा मनुष्यबळाअभावी केंद्र कमी करण्याचा निर्णय महासंघाने घेतला आहे. त्यामुळे यंदा राज्यातील केंद्रांची संख्या कमी केली आहे. जिल्हा प्रमुख कापूस उत्पादक प्रदेशात येते. गेल्या हंगामातही मोठ्या प्रमाणात पणन व "सीसीआय'च्या केंद्रांवर कापसाची खरेदी झाली. कोरोनामुळे तर ऑगस्ट महिन्यापर्यंत कापसाची खरेदी सुरू होती. त्यात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने अनेक अडचणींना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागले. शिवाय पणन महासंघाची मोठी गोची झाली. त्यामुळे यंदा कमी खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय पणन महासंघाने घेतला आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील केंद्रांवरही दिसणार आहे. यावेळी यवतमाळ, कळंब व आर्णी या तीनच ठिकाणी पणनची कापूस खरेदी होणार आहे. 

हेही वाचा - नव्या पिढीला विदर्भातील लोकप्रिय भुलाबाईच्या उत्सवाचा...

'सीसीआय'ची कापूस खरेदी अद्याप सुरू झालेली नाही. पणन केंद्र नोव्हेंबरमध्ये सुरू होण्याची शक्‍यता आहे. गेल्या वर्षी 'पणन'च्या केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. जिनिंग प्रेसिंग संख्याही वाढली. त्यात पावसाचे आगमन झाल्याने गोंधळ उडाला. आधीच मनुष्यबळ कमी असल्याने कामकाज चालविताना पणन महासंघाला अडचणी येत आहेत. त्यामुळे यंदा केंद्रांची संख्या कमी करण्यात आली. अद्याप सीसीआयच्या केंद्राची संख्या निश्‍चित झालेली नाही. सीसीआय केंद्र कमी करण्याच्या तयारीत आहे. अशास्थितीत यंदाही शेतकऱ्यांना एका तालुक्‍यातून दुसऱ्या तालुक्‍यात कापूस घेऊन जाण्याची वेळ येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता कशा पद्धतीने खरेदीचे नियोजन होते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - वाघाचे तीन अशक्त बछडे आढळले; एकाचा मृत्यू, आईचा शोध...

वणी विभागात दोन केंद्र -
महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाने 2020-21 या हंगामातील कापूस खरेदी केंद्रांची यादी निश्‍चित केली आहे. 30 केंद्रांच्या या यादीत यवतमाळ विभागात तीन केंद्र निश्‍चित केली आहेत. वणी विभागात दोन केंद्र आहेत. त्यात जिल्ह्यातील मारेगाव व चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा-चिमूर या केंद्रांचा समावेश आहे. असे असले तरी पहिल्या यादीत पुसदचे केंद्र कमी झाल्याचे दिसून येत आहे.

loading image