राज्यात कुठे सुरू होतोहेत पणनची कापूस खरेदी केंद्रे, वाचा

विनोद इंगोले ः सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

टप्प्याटप्प्याने तब्बल 42 खरेदी केंद्र उघडण्यात येणार

 

नागपूर ः सीसीआयची खरेदी सुरू असली तरी कापूस पणन महासंघातर्फे येत्या बुधवारपासून (ता.27) खरेदी करण्याच्या निर्णयावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. राज्यात टप्प्याटप्प्याने तब्बल 42 खरेदी केंद्र उघडण्यात येणार असून ती यादीदेखील अंतिम झाली आहे. अमरावती येथील सहकारी जिनिंग परिसरात काटापूजनाने खरेदीची सुरुवात होईल.

राज्यात मॉन्सुनोत्तर पावसामुळे बोंडातच कापूस भिजला. त्यामुळे कापसाची खरेदी आताच केल्यास ओला कापूस मोठ्या प्रमाणात येण्याची भीती आहे. त्यातच कापसाची स्टेपल लेंथ आणि दर्जाही योग्य नसल्याने असा कापूस खरेदी केल्यास त्यापासून तयार गाठींच्या खरेदीसाठी कोणीच तयार होणार नाही. त्यामुळे यावर्षी कापूस पणन महासंघाकडून दिवाळीच्या आधी व त्यानंतरही खरेदीबाबत अनिश्‍चीतता होती. बाजारात मात्र कापूस कमी दराने खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली. त्यामुळे पणन महासंघाने बाजारात हस्तक्षेप करावा, याकरिता दबाव वाढला होता.

पणन महासंघ स्वतंत्र कापूस खरेदी न करता सीसीआयकरिता एजंट म्हणून खरेदी करतो. त्यामुळे निकृष्ट कापूस खरेदीनंतर त्यापासून तयार गाठींची उचलच सीसीआयने केली नाही तर मग काय? असा प्रश्‍न पणन महासंघासमोर होता. या साऱ्या मुद्यांवर गुरुवारी (ता. 14) मुंबई पणन सचिव अनुपकुमार यांच्याशी कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख, उपाध्यक्ष ऍड. सोळंके, संचालक प्रसन्नजीत पाटील यांनी चर्चा केली. त्यानंतर बुधवार (ता. 27) पासून पणन महासंघ खरेदी केंद्र उघडण्याचे ठरले.

कापसात आठ टक्‍क्‍यापर्यंत आर्द्रता असेल तरच हमीभाव दिला जाणार आहे. त्यानंतर प्रती टक्‍यानुसार प्रतिकिलोची किंमत कमी होईल. बारा टक्‍क्‍यापर्यंत आर्द्रता असेल तर चार किलोचे हमीभावानुसार पैसे कमी केले जाणार असल्याचे पणनच्या सूत्रांनी सांगितले. कापसाचा हमीभाव 5,550 रुपये असून आर्द्रतेचा विचार करूनच शेतकऱ्यांना पैसे दिले जातील.

असे आहेत केंद्र
अकोला ः बोरगावमंजू, मानोरा, कारंजा
अमरावती ः अमरावती, लेहगाव, अंजनगाव, अचलपूर, वरुड
नागपूर ः सावनेर, काटोल, पारशिवनी, उमरेड, फुलगाव
नांदेड ः भोकर, तामसा.
परभणी ः गंगाखेड, हिंगोली, परभणी
वणी ः चिमूर, गोंडपिंपरी
यवतमाळ ः यवतमाळ, आर्णी, पुसद, कळंब, उमरखेड
खामगाव ः जळगाव जामोद, देऊळगावराजा
औरंगाबाद ः बालानगर, तुर्काबाद, सिल्लोड, खामगाव फाटा, चापडगाव.
परळी ः माजलगाव, भोपा, धर्मापुरी, गोडगाव हुडा, केज
जळगाव ः धरणगाव, अमळनेर, दळवेल, भडगाव, येवला.

शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकण्याऐवजी चेकने चुकारे व्हावे, यासाठी आम्ही आग्रही आहोत. प्रशासनिकस्तरावर त्याला मान्यता मिळाल्यास हा निर्णय घेतला जाईल. कापसाची खरेदी 27 नोव्हेंबरपासून होणार आहे.
- अनंतराव देशमुख,
अध्यक्ष, कापूस पणन महासंघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cotton shopping centers of marketing starting