सैन्यभरतीच्या ठिकाणी तोतया जवानास अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

यवतमाळ - येथील जिल्हा क्रीडासंकुलात गेल्या आठ दिवसांपासून सैन्यभरती सुरू आहे. या ठिकाणी एका तोतया सैनिकाला अटक करण्यात आली. ही घटना शनिवारी (ता. 14) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. 

यवतमाळ - येथील जिल्हा क्रीडासंकुलात गेल्या आठ दिवसांपासून सैन्यभरती सुरू आहे. या ठिकाणी एका तोतया सैनिकाला अटक करण्यात आली. ही घटना शनिवारी (ता. 14) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. 

जितू दादाराव जाधव (वय 21, रा. महागाव, ता. बार्शी टाकळी, जि. अकोला) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून यवतमाळ येथे गेल्या 6 जानेवारीपासून सैन्यभरती सुरू आहे. त्यासाठी रोज हजारो उमेदवार येत आहेत. त्यामुळे या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी भरती सुरू असलेल्या मैदानातून बाहेर जाण्यासाठीच्या गेटवर पोलिस कर्मचारी संतोष सुरमवार व नितीन इंगोले हे कर्तव्यावर असताना सैनिकी पोशाखातील एक तरुण भरती मैदानाकडे जात होता. या दोघे पोलिसांनी त्याला हटकले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याच्यावर संशय आला. म्हणून त्याला ताब्यात घेऊन सैनिक भरतीच्या ठिकाणी असलेल्या सैन्य अधिकाऱ्यांकडे त्याला नेण्यात आले. अधिकाऱ्यांनी हा आमचा जवान नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर त्याला पोलिस ठाण्यात नेण्यात आले. अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा तपास पोलिस करीत आहेत. 

Web Title: Counterfeit jawan arrested