ऐका हो ऐका! निसर्गप्रेमींसाठी सूवर्णसंधी! करा फुलपाखरांसोबत फुल टू मज्जा

मिलिंद उमरे
Friday, 11 September 2020

निसर्गामध्ये फुलपाखरांची अनन्यसाधारण भूमिका आहे. पक्षी व अन्य कीटकांचे खाद्य म्हणून फुलपाखरे महत्त्वाची भूमिका बजावतात. फुलपाखरू हा अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे.

गडचिरोली : आपल्या विविधरंगी पंखांनी भिरभिरत सृष्टीला सुंदर करतानाच प्रत्येकाच्या डोळ्यांना सुखावणारी फुलपाखरे आणि मानवाचा अतूट संबंध आहे. पण, विविध वन्यजीव, वनस्पतींसोबतच ही नाजुक फुलपाखरेही आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहेत. म्हणून सृष्टीतील या नितांत सुंदर जिवाची सर्वांना ओळख व्हावी, महत्त्व पटावे व त्याच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने कटिबद्ध व्हावे, यासाठी भारतात प्रथमच सप्टेंबर महिना बिग बटरफ्लाय मंथ म्हणून साजरा करण्यात येतो आहे. त्यामुळे प्रत्येक निसर्गप्रेमी नागरिकाला फुलपाखरांच्या सानिध्यात फुल टू मज्जा करता येणार आहे.

भारतात प्रथमच देशभरातील फुलपाखरू तज्ज्ञ, फुलपाखरांचे अभ्यासक, निरीक्षक व जैवविविधता संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या अनेक संस्था मिळून सप्टेंबर महिन्यात फुलपाखरांचा विशेष महिना 'बिग बटरफ्लाय मंथ भारत २०२०' साजरा करीत आहेत. यानिमित्त १५ ते २० सप्टेंबर २० दरम्यान फुलपाखरांची महागणना आयोजित करण्यात आली आहे. फुलपाखरू व जैवविविधता क्षेत्रात कार्य करणाऱ्या बहार नेचर फाउंडेशनसह भारतातील ४० पेक्षा अधिक संस्था या उपक्रमात सहभागी होत असून गडचिरोली जिल्ह्यात निसर्ग संशोधन व संवर्धन क्षेत्रात कार्यरत क्रेन्स (कंझर्वेशन, रिसर्च ऍण्ड नेचर एज्युकेशन सोसायटी) या संस्थेनेही स्थानिक निसर्गप्रेमींना फुलपाखरू महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

निसर्गामध्ये फुलपाखरांची अनन्यसाधारण भूमिका आहे. पक्षी व अन्य कीटकांचे खाद्य म्हणून फुलपाखरे महत्त्वाची भूमिका बजावतात. फुलपाखरू हा अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे. तसेच परागीकरणासाठी फुलपाखरांचे कार्य महत्त्वपूर्ण ठरते. देशातील सर्व फुलपाखरूप्रेमींना या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमासाठी एका ठिकाणी आणून देशातील फुलपाखरांच्या अधिवासांच्या रक्षणासाठी प्रयत्न करणे तसेच नवीन अधिवासनिर्मितीसाठी झटणे, हे बिग बटरफ्लाय मंथ या कार्यक्रमाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. शिवाय या अनुषंगाने फुलपाखरांची रंगीबेरंगी दुनिया, त्यांची नावे, त्यांचे आयुष्य, कार्य आदींचा परिचय करून घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

भारत हा विशाल व वैविध्यपूर्ण अधिवास असलेला देश आहे. एवढ्या मोठ्या भूभागातील फुलपाखरांच्या माहितीचे संकलन करणे मोजक्‍या संख्येत असलेल्या तज्ज्ञ व अभ्यासकांना अशक्‍यप्राय असते. म्हणूनच जनसहभागातून माहितीचे संकलन व शास्त्रीय पद्धतीने मांडणी करता येते. या संकल्पनेवर आधारित या फुलपाखरू महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सविस्तर वाचा -  अखेर मुंढेंच्या मनासारखे काय झाले? वाचा सविस्तर

विविध स्पर्धा
या महोत्सावाच्या अनुषंगाने फुलपाखरांचे छायाचित्रण स्पर्धा, चलचित्रण स्पर्धा, तसेच फुलपाखरांवरील लिखाण स्पर्धा(लेख,गोष्ट, कविता, गीत)आयोजित करण्यात आल्या आहेत. या सगळ्या प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत २० सप्टेंबर २०२० पर्यंत आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Counting of butterflies in month september