आज मतमोजणी; 755 उमेदवारांचा होणार फैसला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

विदर्भातील 62 विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी गुरुवारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह 755 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होईल. 

नागपूर : विदर्भातील 62 विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी उद्या गुरुवारी सकाळी 8 पासून सुरू होणार आहे. मतमोजणीचे कल सुमारे एक तासानंतर कळण्याची शक्‍यता असून दुपारी तीनपर्यंत पूर्ण निकाल स्पष्ट होईल, अशी संभावना आहे. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह 755 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होईल. 
अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये 30 मतदारसंघ असून तेथे एकूण 367 उमेदवार रिंगणात आहेत. यात राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे (सिंदखेडराजा), भाजपचे डॉ. संजय कुटे (जळगाव जामोद), डॉ. सुनील देशमुख (अमरावती), डॉ. अनिल बोंडे (मोर्शी), मदन येरावार (यवतमाळ), कॉंग्रेसच्या यशोमती ठाकूर (तिवसा), शिवाजीराव मोघे (आर्णी), शिवसेनेचे संजय राठोड, रिपाइंचे डॉ. राजेंद्र गवई, प्रहारचे बच्चू कडू (अचलपूर), स्वाभिमानचे रवी राणा (बडनेरा) या प्रमुख उमेदवारांचे भवितव्य उद्याच्या मतमोजणीत स्पष्ट होणार आहे. 
नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये 32 मतदारसंघ असून येथे 388 उमेदवार लढतीत आहेत. यात मुख्यमंत्री फडणवीस (दक्षिण-पश्‍चिम नागपूर), अर्थमंत्री मुनगंटीवार (बल्लारपूर), विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार (ब्रह्मपुरी) यांच्यासह कॉंग्रेसचे रणजित कांबळे (देवळी), विकास ठाकरे (पश्‍चिम नागपूर), नाना पटोले, भाजपचे डॉ. परिणय फुके (साकोली), गोपालदास अग्रवाल (गोंदिया), राष्ट्रवादीचे अनिल देशमुख (काटोल), धर्मरावबाबा आत्राम (अहेरी) या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. 
काही अपक्ष उमेदवारांच्या लढतींकडेही राजकीय क्षेत्राची नजर राहणार आहे. यात बच्चू कडू, रवी राणा यांच्यासोबतच किशोर जोरगेवार (चंद्रपूर), वामनराव चटप (राजुरा), पारोमिता गोस्वामी (ब्रह्मपुरी), प्रमोद मानमोडे (दक्षिण नागपूर) यांचा समावेश आहे. 
याव्यतिरिक्‍त यंदा सर्वच पक्षातील अनेक प्रमुख नेत्यांनी बंडखोरी करून अपक्ष वा अन्य पक्षाकडून उमेदवारी दाखल केली. त्यात चरण वाघमारे, विनोद अग्रवाल, नरेंद्र भोंडेकर, रामरतन राऊत, अनंतराव देशमुख, विजयराज शिंदे, राजू तोडसाम, नीलेश विश्‍वकर्मा, आशीष जयस्वाल, दिलीप बन्सोड, संजय देशमुख, विश्‍वनाथ विणकरे, संतोष ढवळे यांचा समावेश आहे. ते या निवडणुकीत काय कामगिरी करतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Counting today; 755 candidates decide to be