वेतन मिळो न मिळो, मात्र कॉव्हेंट शिक्षक देताहेत विद्यार्थ्यांना `ऑनलाइन` धडे

साईनाथ सोनटक्के
Tuesday, 29 September 2020

कॉन्व्हेंट शाळांच्या शिक्षकांना अद्यापही पगार मिळाले नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे. कॉन्व्हेंट शिक्षकांनी अल्पावधीतच हा प्रयोग उत्तमरित्या आत्मसात करीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे देणे सुरू केले. त्यामुळे शासनाने शिक्षकांचे वेतन द्यावे, अशी मागणी खासगी संस्थाचालकांनी केली आहे.

चंद्रपूर : शासकीय असो वा खासगी शाळांतील शिक्षक विद्यादानाचे कार्य करतात. शासकीय शाळांतील शिक्षकांना भरपूर वेतन दिले जाते. खासगी इंग्रजी मीडियम कॉन्व्हेंट शाळा या विनाअनुदानित असल्याने संस्थाचालक मनमर्जीनुसार अल्पसे वेतन देतात. या अल्पशा वेतनातही हे सर्व शिक्षक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी कुठलीही कसर सोडत नाहीत. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या शाळा बंद आहेत.

संस्थाचालकांकडे पगारासाठी पैसे नाहीत. त्यामुळे अल्पसे वेतनही वेळेवर हातात पडत नाही. अशास्थितीतही कॉन्व्हेंटचे शिक्षक विद्यार्थ्यांना ‘ऑनलाइन' शिक्षण देण्यासाठी धडपड करीत आहेत.

 

देशासह राज्यात मार्च महिन्यापासून कोरोनाने कहर केला आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून शाळा बंदचा निर्णय घेतला. त्यानंतर संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आले. सर्व नागरिक सुरक्षिततेसाठी घरात असताना याच काळात सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला. मात्र, कोरोनाचा संसर्ग आटोक्‍यात येत नसल्याने शाळा सुरू करण्यात आल्या नाहीत. अशात नवीन सत्रही सुरू झाले. त्यामुळे कॉन्व्हेंट शाळांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षण सुरू केले. विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांनाही ऑनलाइन शिक्षण हा नवीन प्रयोग आहे. मात्र, कॉन्व्हेंट शिक्षकांनी अल्पावधीतच हा प्रयोग उत्तमरित्या आत्मसात करीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे देणे सुरू केले आहे.

 

पालकांनी शुल्क भरले नाही

शाळा बंद असल्याने अनेक पालकांनी शुल्क भरण्याकडे पाठ फिरविली. या शुल्कातूनच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जात होते. शुल्कातून येणारी आवक बंद झाल्याने शिक्षकांच्या वेतनावर त्याचा परिणाम झाला. आधीच अल्पशा मानधनात काम करणाऱ्या शिक्षकांना वेतनासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. संस्थाचालक पैशाची जुडवाजुडव करून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देण्यासाठी प्रयत्नरत आहेत. अशास्थितीतही आर्थिक चटके सोसत कॉन्व्हेंटचे शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी धडपड करीत आहेत.

जाणून घ्या : हस्त, चित्रा, स्वाती नक्षत्रही बरसणार; हवामान अभ्यासकाने वर्तविला अंदाज 

शासनाने वेतन द्यावे

कॉन्व्हेंट शाळांमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्कूलबस चालक, वाहक हे कर्मचारी कार्यरत आहेत. राज्यभरात हा आकडा दहा लाखांच्या घरात आहे. या शाळांना अनुदान मिळत नसल्याने या कर्मचाऱ्यांचे वेतन विद्यार्थ्यांच्या फीमधून केले जाते. शाळा बंद असल्याने पालकांनी शुल्क जमा केले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन कसे करायचे, असा प्रश्‍न संस्थाचालकांसमोर निर्माण झाला आहे. पालकांनी शुल्क जमा न केल्यास नाइलाजास्तव शाळा बंद करण्याची वेळ येऊ शकते, असे संस्थाचालक बोलू लागले आहेत. त्यामुळे शासनाने कोरोना आपात्कालीन फंडातून कर्मचाऱ्यांचे वेतन करावे, २०१८-१९ मधील आरटीईअंतर्गत शिक्षण विभागाकडे थकीत रक्कम तातडीने देण्यात यावी, २०१९-२० ची शंभर टक्के फी परतावा रक्कम तातडीने अदा करावी, ऑनलाइन शिक्षण पद्धतीसाठी येणाऱ्या खर्चासाठी संस्थांना ऍडव्हॉन्स रक्कम देण्यात यावी, अशी मागणी विदर्भ इंग्लिश स्कूल, ट्रस्टीस असोसिएशन चंद्रपूरच्या वतीने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

अवश्य वाचा : ऑनलाइन शिकविणाऱ्या शिक्षकांचीच आता दर आठवड्याला भरणार शाळा!

नाइलाजास्तव शाळा बंद करू
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कॉन्व्हेंट शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे. यादरम्यान अनेक पालकांनी शाळांकडे शुल्क जमा केलेले नाही. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन कसे करायचे, असा प्रश्‍न संस्थाचालकांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने खासगी इंग्रजी मीडियम कॉन्व्हेंट शाळांतील कर्मचाऱ्यांचे वेतन द्यावे, अन्यथा नाइलाजास्तव शाळा बंद करावे लागेल.
- गिरीश चांडक
अध्यक्ष, विदर्भ इंग्लिश स्कूल, ट्रस्टीस असोसिएशन, चंद्रपूर.

 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covent teachers offer online lessons to students