विद्यार्थ्यांच्या कलागुणांसाठी मिळणार "क्रेडिट'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

नागपूर : विद्यार्थ्यांना ज्ञान मिळविण्यासाठी कुठलीही आडकाठी येऊ नये यासाठी अभ्यासक्रमासोबत त्यांच्यातील कलागुणांसाठी क्रेडिट देण्याच्या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोगाकडून "नॅशनल ऍकेडमीक क्रेडिट बॅंक' तयार करण्यात येणार असल्याची माहिती अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष प्रा. भूषण पटवर्धन यांनी आज येथे दिली.

नागपूर : विद्यार्थ्यांना ज्ञान मिळविण्यासाठी कुठलीही आडकाठी येऊ नये यासाठी अभ्यासक्रमासोबत त्यांच्यातील कलागुणांसाठी क्रेडिट देण्याच्या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोगाकडून "नॅशनल ऍकेडमीक क्रेडिट बॅंक' तयार करण्यात येणार असल्याची माहिती अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष प्रा. भूषण पटवर्धन यांनी आज येथे दिली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 96 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आले असताना, पत्रकारांशी बोलत होते. प्रा. पटवर्धन म्हणाले, विद्यार्थ्यांना नेमके काय हवे आहे, याचा विचार होताना दिसत नाही. प्रत्येकाला डॉक्‍टर वा इंजिनिअर करायचे का? हा प्रश्‍न आहे. विद्यार्थ्याला ज्ञान मिळविण्यासाठी कुठल्याही महाविद्यालयात प्रवेश घेण्याआधीपासून जर त्याला ज्ञान मिळविण्याची सुरुवात केल्यानंतरही त्याची दखल घेणे गरजेचे आहे. यासाठीच अनुदान आयोगाने क्रेडिट बॅंक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाशिवाय इतर विषयांची आवड असेल अशा विद्यार्थ्यांना इतर संस्थेतही सहभाग नोंदवित, त्या विषयांचे क्रेडिट देण्यासाठी अनुदान आयोगाकडे अकाउंट सुरू करावे लागणार आहे. अकाउंट उघडल्यावर, त्याला नियमित अभ्यासक्रमाच्या आधारावर मिळालेल्या 70 टक्के क्रेडिटनुसार विद्यापीठाची पदवी मिळेल. मात्र, उरलेले 30 टक्के क्रेडिट विद्यार्थ्यांना इतर विद्यापीठ, सामाजिक, तांत्रिक संस्थामधून केलेल्या कामातून मिळविता येणार आहे. या बॅंकेची सुरुवात करण्यासाठी समिती तयार केली असून पुढल्या दोन आठवड्यांत त्याचा अहवाल येईल. यानंतर पुढल्या शैक्षणिक वर्षापासून नॅशनल ऍकेडमीक क्रेडिट बॅंक सुरुवात होईल, असे ते म्हणाले.

स्वायत्त महाविद्यालयांवर विद्यापीठांचेच नियंत्रण
विद्यापीठांमध्ये अधिकाअधिक स्वायत्त महाविद्यालये तयार करण्यावर अनुदान आयोगाचा भर आहे. मात्र, त्या महाविद्यालयांमध्ये स्वैराचार वाढत असल्यास त्यावर कारवाई करण्याचा अधिकार संपूर्ण विद्यापीठांचा आहे. यासंदर्भात विद्यापीठांकडून तक्रार आल्यास त्यावर निश्‍चित कारवाई होईल. मात्र, या महाविद्यालयांवर संपूर्णत: विद्यापीठांचे नियंत्रण राहणार असल्याची माहिती प्रा. भूषण पटवर्धन यांनी दिली.
पदभरतीसाठी केंद्र, राज्यांनी संयुक्तिक निर्णय घ्यावा
महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या पदांची समस्या अधिकच भीषण आहे. ती समस्या सोडविण्यासाठी केंद्र आणि राज्य एकत्र येत सकारात्मकपणे निर्णय घेण्याची गरज आहे. अनुदान आयोगाच्या मर्यादा आहेत. पदभरतीशिवाय गुणवत्ता साध्य होणे कठीण असल्याचे प्रा. पटवर्धन म्हणाले.
सेमिस्टर पद्धतीत बदल नाहीच
सेमिस्टर सिस्टममुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत नसल्याने ही पद्धत बंद करण्याची ओरड सुरू आहे. मात्र, सेमिस्टर सिस्टममुळे नियमित गुणांकन होत असल्याने ती पद्धत बंद करता येणार नसल्याचे प्रा. पटवर्धन यांनी स्पष्ट केले. कलागुण आणि आवडीच्या विषयांचा अभ्यास करण्यासाठी चॉईस बेस क्रेडीट सिस्टम लावण्यात आल्याचे ते म्हणाले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Credit" for student skills