ढिसाळ नियोजनामुळे उद्‌घाटनाला गालबोट

धुटी (डोंगरगाव) - नागपुरात सुरू केलेल्या क्रिकेट अकादमीचे उद्‌घाटन करताना महेंद्रसिंह धोनी. बाजूला डॉ. मोहन गायकवाड, मिहीर दिवाकर, मंगेश राऊत व इतर.
धुटी (डोंगरगाव) - नागपुरात सुरू केलेल्या क्रिकेट अकादमीचे उद्‌घाटन करताना महेंद्रसिंह धोनी. बाजूला डॉ. मोहन गायकवाड, मिहीर दिवाकर, मंगेश राऊत व इतर.

नागपूर - ढिसाळ नियोजन, बाऊन्सर्सची मनमानी आणि चाहत्यांच्या अलोट गर्दीमुळे प्रचंड धक्‍काबुक्‍की झाल्याने एसजीआर स्पोर्टस अकादमीतर्फे गायकवाड-पाटील इंटरनॅशनल स्कूल परिसरात आयोजित एसजीआर स्पोर्टस-महेंद्रसिंह धोनी अकादमीच्या उद्‌घाटन समारंभाचा पचका झाला. या दुर्दैवी प्रकारामुळे व्यथित झालेल्या महेंद्रसिंह धोनीने उर्वरित कार्यक्रमातून  काढता पाय घेतला. त्यामुळे उद्‌घाटनासाठी आलेल्या शेकडो चाहते व युवा क्रिकेटपटूंची निराशा झाली.   

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या हस्ते धुटी (डोंगरगाव) येथील  गायकवाड-पाटील इंटरनॅशनल स्कूल परिसरात अकादमीचे बुधवारी सकाळी उद्‌घाटन झाले. उद्‌घाटनापूर्वी आणि उद्‌घाटनादरम्यान बाऊन्सर्सनी चाहत्यांना रोखण्यासाठी धक्‍काबुक्‍की केली. त्यांच्या मनमानीचा क्रिकेटप्रेमी व लहान मुलांसोबतच प्रसारमाध्यमालाही फटका बसला. 

डोळ्यासमोर घडलेल्या या प्रकारामुळे धोनी व्यथित झाला आणि उद्‌घाटनाच्या औपचारिकतेनंतर तो तडकाफडकी हॉटेलकडे निघून गेला. त्यामुळे आयोजकांना नाईलाजास्तव उर्वरित कार्यक्रम रद्द करावा लागला. निर्धारित कार्यक्रमानुसार धोनी उद्‌घाटनानंतर मैदानावर प्रशिक्षणार्थींना धडे देण्यासोबतच त्यांच्याशी हितगुज करणार होता. शिवाय अकादमीतील सोयीसुविधांदेखील पाहणी करणार होता. जवळपास तीन-चार तासांचा त्याचा मुक्‍काम होता. मात्र, नियोजनशून्यतेमुळे उद्‌घाटन समारंभावर विरजण पडले. घडलेल्या प्रकारासाठी एसजीआर स्पोर्टस अकादमीने शाळेला जबाबदार धरले, तर शाळेने याचे खापर बाऊन्सर्सच्या माथी फोडले. 

धोनीने यावेळी पालकांनाही मुलांचा कल व आवडनिवड लक्षात घेऊन प्रोत्साहन देण्याचा यावेळी सल्ला दिला. तसेच येथील सोयीसुविधांचा चांगला उपयोग करून देण्याचे आवाहन केले. धोनीने नागपुरातील गोड आठवणींनाही यावेळी उजाळा दिला. उद्‌घाटन समारंभाला धोनीचे मित्र व माजी रणजीपटू मिहीर दिवाकर, गायकवाड पाटील समूहाचे डॉ. मोहन गायकवाड, एसजीआर  अकादमीचे संचालक मंगेश राऊत, शाळेच्या प्राचार्या शाबिह चौरसिया, कोकिळा राऊत, लवलेश राऊत आदी उपस्थित होते.

यावेळी धोनीच्या हस्ते पाच लकी विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच युवा क्रिकेटपटूंच्या प्रश्‍नांची उत्तरे दिली. धोनीच्या महाराष्ट्रातील या पहिल्यावहिल्या अकादमीत नागपूर, मराठवाडा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशातील जवळपास १२५ युवा क्रिकेटपटूंनी प्रवेश निश्‍चित केला आहे.

खेळावर ‘फोकस’ करा, यश हमखास
क्रिकेटचे धडे देणारी अकादमी कुठली असोत, सोयीसुविधा आणि शिकविणारे गुरुजी कोणतेही असोत. अकादमीमध्ये प्रवेश घेणारा खेळाडू किती गंभीरतेने कौशल्य आत्मसात करतो, यावर सर्वकाही अवलंबून असते. मेहनत करणारा खेळाडू हमखास आयुष्यात यशस्वी ठरतो. त्यामुळे यशापयशाचा अजिबात विचार न करता क्रिकेटपटूंनी केवळ खेळावर ‘फोकस’ करून आपले उज्ज्वल करिअर घडवावे, असा कानमंत्र महेंद्रसिंह धोनीने उद्‌घाटनप्रसंगी अकादमीतील  उद्‌योन्मुख खेळाडूंना दिला. आपल्या छोटेखानी भाषणात धोनी म्हणाला, खेळामध्ये यशाचा कोणताही ‘फिक्‍स फॉर्म्युला’ नाही.

तुम्हाला तुमची मेहनतच पुढे नेत असते. शाळेत शिकताना जसे विद्यार्थ्यांना विविध परीक्षांना सामोरे जावे लागते. तीच गोष्ट खेळालाही लागू पडते. यातही ताबडतोब ‘रिझल्ट’ मिळतो. जिंकले किंवा चांगला ‘परफॉर्मन्स’ दिला तर, पाठीवर शाबासकीची थाप पडते आणि अपयशी ठरले तरीही शिकायला मिळते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com