क्रिकेट सट्टेबाजांनी ठोकला ग्रामीण भागात तळ!

file photo
file photo

नागपूर : क्रिकेट वर्ल्डकप अंतिम टप्प्यात असून, केवळ उपांत्य व अंतिम सामना बाकी आहे. या संधीचे सोने करून कोट्यवधींची उलाढाल करण्यासाठी क्रिकेट सट्टेबाजांनी ग्रामीण भागात तळ ठोकला आहे. त्यांना ग्रामीण पोलिसांचा आशीर्वाद असल्याची माहिती पोलिस विभागातील विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. क्रिकेट विश्‍वचषकातील दुसरा उपांत्य सामना गुरुवारी (ता. 11) ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड संघात खेळला जाणार आहे. अंतिम सामना रविवारी (ता. 14) खेळला जाणार आहे. वर्षभरापूर्वी शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेली क्रिकेट सट्टेबाजी सध्या ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत वळती झाली आहे. शहरात पोलिस ठाणे, बीट अंमलदार, विशेष पथक, गुन्हे शाखेचे पथक, अति. आयुक्‍तांचे पथक असे अनेक "झंझट' असते. त्यामुळे शहरात सट्टेबाजी करण्यासाठी लाखोंचे नुकसान सहन करावे लागते.मात्र, ग्रामीण भागात केवळ तीन पोलिस अधिकाऱ्यांना "मॅनेज' केल्यास कोट्यवधींची उलाढाल करणे सोपे होते. त्यामुळे जवळपास 90 टक्‍के सट्टेबाजांनी ग्रामीण पोलिसांची हद्द क्रिकेट खायवाडी-लगवाडीसाठी निवडल्याची माहिती पोलिसांतील विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. उमरेड, बुटीबोरी, खरसोली, कामठी, बेला, हिंगणा, वाडी, कन्हान, खापरखेडा, मौदा, रामटेक, सावनेर, कळमेश्‍वर, कुही आणि अरोली भागात सट्टेबाजांनी बस्तान मांडले आहे. उपांत्य आणि अंतिम सामन्यात "जमके' सट्टेबाजी होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारतावर सर्वाधिक पैसा लागला आहे. यातून सट्टेबाजांसह वरिष्ठ पोलिस अधिकारीही "मालामाल' होणार असल्याची चर्चा आहे. ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) सट्टेबाजांनी आर्थिक व्यवहार करीत "सेट' केल्याची चर्चा आहे. 30 मेपासून सुरू झालेल्या क्रिकेट वर्ल्डकपदरम्यान ग्रामीण पोलिसांनी नाममात्र कारवाई केली आहे. त्यामुळे ग्रामीण पोलिसांची हद्द "सेफ झोन' असल्याचे क्रिकेट सट्टेबाज सांगतात. एलसीबीचे तत्कालीन प्रमुख संजय पुरंदरे यांनी ग्रामीणमधील जुगार व सट्टेबाजांवर धडाकेबाज कारवाई केली होती. परंतु, आता एलसीबी सेट झाल्याची चर्चा आहे.
गुन्हे शाखेचा वचक
गुन्हे शाखेचे अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त नीलेश भरणे यांनी शहरात दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळे शेकडो क्रिकेट बुकींनी शहर सोडून ग्रामीण भागात बस्तान बसवले आहे. शहरातील गुन्हे शाखेची कारवाई धडाक्‍यात सुरू आहे. त्यामुळे जुगार अड्डे संचालक आणि क्रिकेट सट्टेबाज दहशतीत आहेत. गुन्हे शाखेचा वचक असल्यामुळेच सट्टेबाजांनी ग्रामीणकडे धाव घेतल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com