भारताच्या पराभवाने बुकी "कंगाल'

भारताच्या पराभवाने बुकी "कंगाल'

नागपूर : सेमिफायनल भारतच जिंकेल आणि आपण मालामाल होऊ, या अतिआत्मविश्‍वासामुळे राज्यातील जवळपास सर्वच बुकींची दांडी गुल झाली आहे. बुधवारी झालेल्या अटीतटीच्या लढतीत न्यूझिलॅंडने बाजी मारल्याने सट्टेबाज कंगाल झाले आहेत. विश्‍वचषक स्पर्धेतील भारतीय संघाची घोडदौड पाहता भारतीय संघावर अनेक सट्‌टेबाजांनी पैसा लावला. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथील सट्‌टेबाजांनी भारतावर खायवाडी मोठ्या प्रमाणात करण्यात आली, तर लगवाडी अत्यल्प होती. मंगळवारी भारत-न्यूझीलॅंड संघादरम्यान सामना सुरू होताच भारतावर कोट्यवधी रुपयांची उधळण झाली. सायंकाळच्या सुमारास पाऊस आल्यामुळे सामना थांबविण्यात आला. यावेळी भारताचे पारडे जड होते. त्यामुळे बुधवारी अनेक सट्‌टेबाजांनी लागवाडी आणि खायवाडी मोठ्या प्रमाणात सुरू केली. न्यूझिलॅंडने 240 धावांचे आव्हान भारतासमोर ठेवले. भारत हे आव्हान सहजरीत्या पेलेल, अशी स्थिती असल्यामुळे कोट्यवधीत सट्‌टा खेळला गेला. मात्र, भारताची बॅटिंग सुरू झाल्याच्या 24 धावांत 4 विकेट अशी स्थिती झाल्यानंतर सट्‌टेबाजांच्या मनात धडक भरली होती. हिटर ऋषभ पंत, हार्दिक पांड्या यांचाही प्रतिकार लवकरच संपुष्टात आला. मात्र, फिनिशर धोनी मैदानात असल्याने सट्टेबाजांना मोठी आशा होती. दरम्यान, रवींद्र जडेजाने हाणामारी सुरू केली. चार षट्‌कारांसह त्याने शतकाकडे वाटचाल सुरू केल्याने बुकी निश्‍चिंत झाले होते. भारत विजयाच्या समिप पोहोचल्याने त्यांच्यात उत्साह संचारला होता. रवींद्र जडेजापाठोपाठ महेंद्रसिंग धोनी यानेही अर्धशतक झळकावले. आपण लवकरच मालामाल होणाच्या आनंदाने अनेकांनी पुन्हा खायवडी केली. तेवढ्यात जडेजा आउट झाला. त्यानंतर लगेच धोनीने षट्‌कार ठोकला.
एका अचूक फेकीने सर्वांचा घात
धोनी मॅच फिनिश करूनच परतणार, असा विश्‍वास सर्वांनाच वाटत होता. मात्र, एका अचूक फेकीने सर्वांचा घात झाला. फिनिशर महेंद्रसिंग धोनी रनआउट झाला आणि बुकींनी पॅचअप सुरू केले. भारतीय क्रिकेट प्रेमींची जशी निराशा झाली तशीच स्थिती सट्‌टेबाजांचीही झाली. भारताच्या पराभवाने सट्‌टेबाजांना कोट्यवधींचा फटका बसला असून त्याचा परिणाम दुसरी सेमीफायनल आणि फायनल मॅचमध्येही दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com