‘फॅमिली सपोर्ट’मुळेच घडली देविका

नरेंद्र चोरे
बुधवार, 11 एप्रिल 2018

अष्टपैलू देविका
देविकाने क्रिकेटशिवाय इतरही अनेक छंद जोपासले आहेत. ती तायक्‍वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट असून, या खेळात राज्य पातळीवर अनेक पदके जिंकली आहेत. शिवाय संगीताची प्रचंड आवड आहे, चांगली ड्रमवादक आहे. क्रिकेट खेळून घरी परतल्यानंतर ती ड्रम वाजवून थकवा घालविते. उल्लेखनीय म्हणजे, तिला फोटोग्राफीचाही खूप शौक आहे. क्रिकेटनंतर तिने फोटोग्राफीतच करिअर करावे, अशी आमची आणि तिचीही इच्छा असल्याचे वडिलांनी सांगितले.

नागपूर - खेळाडूच्या जडणघडणीत स्वत:च्या मेहनतीसोबत परिवाराचा पाठिंबाही तितकाच महत्त्वाचा असतो. महिला क्रिकेटपटू देविका वैद्यच्या यशात या दोन्ही गोष्टींचा  महत्त्वाचा वाटा राहिला. घरातील बहुतेक सदस्य उच्च शिक्षित असताना त्यांनी शिक्षणाचा आग्रह न धरता देविकाचे क्रिकेटप्रेम जपले. देविकानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करून त्यांचा विश्‍वास सार्थ ठरविला. घरच्यांचा पाठिंबा व प्रोत्साहनामुळेच देविका इथपर्यंत मजल मारू शकली, अशा भावना देविकाचे पिता पुर्णेंदू आणि आई मौसमी वैद्य यांनी व्‍यक्‍त केल्‍या.

भारत-इंग्लंड महिला संघादरम्यान सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेसाठी नागपुरात  आलेल्या या दोघांनी ‘सकाळ’शी बोलताना आपल्या मुलीच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल माहिती दिली. मर्चंट नेव्हीत कॅप्‍टन असलेले पुर्णेंदू म्हणाले, लहानपणी क्रिकेटचे सामने टीव्हीवर पाहत असतानाच देविका या खेळाकडे आकर्षित झाली. तिची आवड लक्षात घेऊन आम्ही पीवायसी जिमखानामध्ये टाकले. प्रशिक्षक अतुल गायकवाड व त्यानंतर निरंजन गोडबोले यांच्या तालमीत तयार  झाल्यानंतर लवकरच देविकाला बीसीसीआयच्या ज्युनियर व नंतर सिनियर गटातील स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली. लगेच भारतीय संघाचेही स्वप्न पूर्ण झाले. वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका व श्रीलंकेतील विश्‍वकरंडक पात्रता स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यानंतर विश्‍वकरंडकातही तिला संधी होती. परंतु, ऐन स्पर्धेपूर्वी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या चौरंगी मालिकेत क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाल्याने इंग्लंडवारी थोडक्‍यात हुकली. दुखापतीवर मात करत तिने पुन्हा भारतीय संघात पुनरागमन केले.  

ते पुढे म्हणाले, देविका क्रिकेटपटू बनण्यात आमच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. वडील, भाऊ हे सगळे डॉक्‍टर व चांगल्या पदावर असताना सहसा मुलेही त्याच मार्गाने जातात. मात्र, आमचे संयुक्‍त कुटुंब त्याला अपवाद ठरलेय. आजी-आजोबांपासून सर्वांनीच देविकाचे क्रिकेटप्रेम पाहून तिला खेळावरच ‘फोकस’ करण्याचा सल्ला दिला. देविका फिटनेस व आहाराच्या बाबतीत खूपच जागरूक आहे. 

डावखुरी फलंदाज व लेगब्रेक गोलंदाज असलेल्या २० वर्षीय देविकाने जामठा स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध सराव सामन्यात शतक झळकावून आपल्यातील गुणवत्तेचा परिचय करून दिला. आम्ही कधीच देविकावर अपेक्षेचे ओझे लादले नाही. ती जे काही करीत आहे, त्याला आमचा सदैव पाठिंबा असतो. तिने अधिक दडपण न घेता केवळ क्रिकेट ‘एन्जॉय’ करावे, एवढीच आमची अपेक्षा आहे. 

Web Title: cricket player devika vaidya family support