"मैं फिर टीम में वापस आऊंगा'!

नरेंद्र चोरे
शनिवार, 22 डिसेंबर 2018

नागपूर : बोटाच्या दुखापतीनंतर तब्बल दोन ते अडीच महिने क्रिकेटपासून दूर होतो. दीर्घ ब्रेकनंतर पहिल्यांदाच घरगुती क्रिकेटमध्ये खेळतो आहे. त्यामुळे फॉर्म परत मिळविण्यासाठी थोडा उशीरच लागणार आहे. रणजी व अन्य सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यास नक्‍कीच भारतीय संघात पुनरागमन करू शकतो, असा विश्‍वास गुजरातचा अष्टपैलू क्रिकेटपटू अक्षर पटेलने व्यक्‍त केला. पण, सध्या रणजी सामन्यांवरच "फोकस' असल्याचे त्याने सांगितले.

विदर्भाविरुद्ध शनिवारपासून सुरू होत असलेल्या रणजी करंडक सामन्यासाठी नागपुरात आलेल्या अक्षरने "सकाळ'शी बोलताना दुखापत, रणजीतील संघाची व वैयक्‍तिक कामगिरी, पुनरागमन व आयपीएलबद्दल आपल्या भावना व्यक्‍त केल्या. नुकत्याच झालेल्या आयपीएल लिलावात दिल्ली डेअरडेव्हिल्सने पाच कोटींची बोली लावल्याबद्दल विचारले असता अक्षर म्हणाला, पुढील मोसमात दिल्लीकडून खेळायला मिळणार असल्याने उत्सुक आहे. पण, प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास, मी अजूनपर्यंत आयपीएलबद्दल विचारच केला नाही. स्पर्धेला बराच वेळ आहे. सद्यस्थितीत रणजी सामन्यांवरच माझा संपूर्ण "फोकस' आहे. यात चांगली कामगिरी करून संघाला विजय मिळवून देण्याचा माझा प्रयत्न आहे.
"टीम इंडिया'त पुनरागमनाबद्दल विचारले असता 24 वर्षीय अक्षर म्हणाला, बोटाच्या दुखापतीनंतर तब्बल दोन ते अडीच महिन्यांनंतर स्पर्धात्मक क्रिकेट खेळत आहे. दुखापतीतून बाहेर पडून "परफॉर्म' करणे सहज सोपे नसते. रणजी करंडकानंतर लगेचच मुश्‍ताक अली चषक टी-20 सामने होणार आहे. या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केल्यास निश्‍चितच संघात स्थान मिळू शकते. निवडीबद्दल फारशी चिंता न करता प्रत्येक सामन्यामध्ये उत्तम प्रदर्शन करणे, एवढेच माझ्या हातात आहे.
गुजरातच्या कामगिरीवर समाधानी
यंदाच्या रणजी मोसमात गुजरात संघाने आतापर्यंत केलेल्या प्रदर्शनावर अक्षरने समाधान व्यक्‍त केले. प्रतिस्पर्धी संघांबद्दल फारसा विचार न करता, आम्ही केवळ आमचाच विचार करतो. अष्टपैलू या नात्याने माझे काम नेहमीच फलंदाजी आणि गोलंदाजीत भरीव योगदान देणे आहे. सुदैवाने आतापर्यंत त्यात यशस्वी ठरलो आहे. विदर्भाविरुद्धही मी व माझे सहकारी शंभर टक्‍के योगदान देऊन विजय मिळविण्याचा प्रयत्न करतील.

Web Title: cricketer akshar patel news