तळीराम कोर्टात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

नागपूर - 31 डिसेंबरच्या रात्री पोलिसांनी केलेल्या ड्रंकन ड्राइव्ह कारवाईमध्ये सापडलेल्यांनी झिंग उतरताच दंड भरण्यासाठी मंगळवारी (ता. 3) मोटार वाहन न्यायालयात गर्दी केली.

नागपूर - 31 डिसेंबरच्या रात्री पोलिसांनी केलेल्या ड्रंकन ड्राइव्ह कारवाईमध्ये सापडलेल्यांनी झिंग उतरताच दंड भरण्यासाठी मंगळवारी (ता. 3) मोटार वाहन न्यायालयात गर्दी केली.

"नव्या वर्षाचे स्वागत दारू पिऊन करू नका,' "नशेत वाहन चालवू नका' अशा प्रकारचे आवाहन पोलिस विभागाकडून दरवर्षी करण्यात येत असते. यंदादेखील पोलिसांनी ड्रंकन ड्राइव्ह कारवाईत अडकल्यास संबंधिताच्या कार्यालयाला कळविण्यात येईल, अशी तंबी दिली होती. मात्र, पोलिसांच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत तळीरामांनी नववर्ष साजरे केले आणि रात्रभरात तब्बल 520 मद्यपी वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली.

कारवाईमध्ये सापडलेल्या मद्यपींनी चालान भरण्यासाठी चांगलीच गर्दी केली होती. यामुळे कधी नव्हे ते मोटार वाहन न्यायालय "हाउसफुल्ल' दिसून आले. प्राप्त माहितीनुसार अद्याप कारवाईत अडकलेल्यांपैकी अनेकांनी चालान भरलेले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा कारवाईत अडकलेल्या मद्यपींची संख्या कमी आहे. कार्यालयात माहिती कळण्याच्या भीतीपोटी अनेकांनी दारू पिऊन रस्त्यावर निघणे टाळले.

Web Title: crime in nagpur