
Crime : गडचिरोली पोलिस जोमात, तस्कर कोमात! तीन दिवसांत सहा आरोपी अटकेत
गडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात केवळ दारूच नाही, तर गांजा आणि सुगंधी तंबाखुचीही तस्करी मोठ्या प्रमाणात होते. पण आता गडचिरोली पोलिसांनी तस्करांच्या मुसक्या आवळणे सुरू केले असून तीन दिवसांत तस्करांविरोधात दोन जबरदस्त कारवाया केल्या. यात सहा आरोपींनाही अटक करण्यात आली.
गडचिरोली पोलिसांनी गोपनीय बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे रविवार (ता.28) रात्रीच्या दरम्यान शहरातील इंदिरानगर येथील वनउपज तपासणी नाक्यावर लावलेल्या नाकाबंदी दरम्यान 7 लाख 19 हजार 690 रुपये किमतीचा साडेसहा किलो गांजा जप्त करून तीन आरोपींना जेरबंद केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली.
यात अटक केलेल्या आरोपींमध्ये आशीष धनराज कुळमेथे (वय 28), रा. संजयनगर, जि.चंद्रपुर, धनराज मधुकर मेश्राम (वय 23 ) रा. नेहरुनगर जि.चंद्रपुर आणि ज्योती श्रीकृष्ण पराकै (वय 22) रा. शास्त्रीनगर जि. चंद्रपुर यांचा समावेश आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपीच्या ताब्यातील वाहनाची पंचासमक्ष तपासणी केली असता वाहनाच्या डिक्कीत एकूण 99690 रुपये किंमतीचा 6 किलो 646 व सहा लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन. तसेच 20 हजार रुपये किंमतीचे मोबाईल असा एकूण 7 लाख 11 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळला होता.
या आरोपींविरुद्ध गडचिरोली पोलिस स्टेशन येथे गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ (एन.डी.पी.एस.) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर गडचिरोली पोलिसांनी मंगळवार (ता. 30 ) कारवाई करत 55 हजारांची अवैध देशी-विदेशी दारू जप्त केली. तसेच तीन दारू तस्करांनाही अटक केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली शहरात दुचाकीच्या साहाय्याने देशी-विदेशी दारू तस्करी होत असल्याच्या माहितीवरून गडचिरोली पोलिस ठाण्यातील डीबी पथकाने गडचिरोली- चंद्रपूर मार्गावर सापळा रचून 3 दुचाकीसह 55 हजार रुपयांची दारू जप्त केली.
या प्रकरणी डीबी पथकाने अवैध दारू तस्करी करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. धानोरा तालुक्यातील कुथेगाव येथील मंगरू नानू नरोटे (वय 51), फुलबोडी येथील अजय देवराव हिचामी (वय 24) व गडचिरोली तालुक्यातील कनेरी गावातील रावजी मलुराम नैताम (वय 45) अशी अटक करण्यात आलेल्या दारूतस्करांची नावे आहेत.
या तीन अवैध दारूतस्करांकडून 55 हजारांची देशी-विदेशी दारू व दारू तस्करीसाठी वापरण्यात आलेल्या 1 लाख 67 हजार रूपये किंमतीच्या तीन दुचाकी असा एकूण 2 लाख 22 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ठाणेदार अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकातील धनंजय चौधरी, स्वप्नील कुडावले, पुरुषोत्तम हलामी, अतुल भैसारे, वृशाली चव्हाण यांनी केली.
दारूविक्रेत्यांत उडाली खळबळ
गडचिरोली पोलिसांच्या वतीने अवैध दारूविक्री विरोधात निरंतर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यातील दारूविक्री व्यवसाय काही प्रमाणात कमी झाला आहे. मंगळवारी गडचिरोली पोलिस ठाण्यातील डीबी पथकाने मोठी कारवाई करीत 3 दुचाकींसह लाखोंची दारू जप्त केली. गडचिरोली पोलिसांच्या या कारवाईने अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
"शहर पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या गावांमध्ये व गडचिरोली शहरातील वेगवेगळ्या वाॅर्डात अवैध दारू विक्रेत्यांविरोधात कारवाई सुरू आहे. ही कारवाई निरंतर सुरू राहणार आहे."
- अरविंदकुमार कतलाम, ठाणेदार, पोलिस स्टेशन, गडचिरोली