कुख्यात गुंडांची तडीपारी शहरात!

अनिल कांबळे
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

नागपूर : कुख्यात गुंडांचा त्रास कमी करण्यासाठी त्यांना तडीपार केले जाते. मात्र यापैकी 80 टक्के गुंड सेटिंग करून आपल्याच शहरात तडीपारी कापतात. फक्त कायदा आणि कागदोपत्री होणाऱ्या प्रक्रियेलाच तडीपार करण्याचे आव्हान शहराचे नवे पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्यासमोर आहे.

नागपूर : कुख्यात गुंडांचा त्रास कमी करण्यासाठी त्यांना तडीपार केले जाते. मात्र यापैकी 80 टक्के गुंड सेटिंग करून आपल्याच शहरात तडीपारी कापतात. फक्त कायदा आणि कागदोपत्री होणाऱ्या प्रक्रियेलाच तडीपार करण्याचे आव्हान शहराचे नवे पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्यासमोर आहे.
डॉ. उपाध्याय यांनी पदभार स्वीकारताच शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली आहे. त्यांनी तडीपार आरोपींना टार्गेट करीत "सळो की पळो' करून सोडले आहे. नागपूर आयुक्‍तालयातून आतापर्यंत 280 गुंडांवर तडीपारीची कारवाई केली आहे. तर सात महिन्यांत तब्बल 72 गुंडांवर तडीपारीची कारवाई आयुक्‍तांनी केली आहे. या कारवाईमुळे तडीपारांसह गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
मुख्यमंत्र्यांचे शहर असलेल्या उपराजधानीतील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिस आयुक्‍तांनी पोलिस उपायुक्‍त तसेच गुन्हे शाखेला कडक निर्देश दिले आहेत. शहरातील गुन्हेगारी जगतात चर्चित असलेल्या गुन्हेगारांची तपासणी, त्यांचा ठावठिकाणा तसेच त्यांच्यावर "वॉच' ठेवण्याचेही निर्देश त्यांनी दिले आहेत. गेल्या तीन वर्षांत 280 गुंडांना तडीपार करण्यात आले आहे. त्यापैकी अनेक गुंड शहरात लपूनछपून राहतात. जवळपास 80 टक्‍के तडीपार आठ दिवसांतच शहरात परत येतात, ही बाब लक्षात घेताच त्यांनी गुन्हे शाखेला तडीपार गुंडांची "सर्च' मोहीम सुरू केली. आतापर्यंत गुन्हे शाखेने दोन दिवसांत 12 तडीपार गुंडांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. त्यांच्यावर संबंधित ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.
गुन्हे शाखेची धरपकड
गुंडांवर तडीपारीची कारवाई करण्यात येते. मात्र, काही पोलिस कर्मचारी "सेटिंग' करून तडीपार गुंडांना पुन्हा शहरात प्रवेश देतात, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे गुन्हे शाखेने धडक मोहीम सुरू करून शहरातील तडीपारांची धरपकड सुरू केली. गुन्हे शाखा सतर्क होताच पुन्हा गुंडांनी शहरातून पळ काढला आहे. गुन्हे शाखेने दोन दिवसांतच 142 तडीपार गुंडांची तपासणी केली आहे.
बक्षीस योजना राबवावी
औरंगाबाद पोलिस आयुक्‍तालयाने तडीपार गुंड शहरात दिसल्यास पोलिसांना माहिती देणाऱ्यास 1 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. माहिती देणाऱ्याचे नावही गुप्त ठेवण्याचा विश्‍वास सामान्य नागरिकांना दिला आहे. त्याप्रमाणे नागपूर शहरातही असाच उपक्रम राबविल्यास शहरात राहणाऱ्या तडीपार गुंडांची संख्या कमी होऊ शकते, तसेच गुन्हेगारांवरही वचक राहू शकतो.
शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कारवाईचा धडाका असाच सुरू राहील. भविष्यात गुंड प्रवृत्तीला थारा मिळणार नाही. शहरातील गुन्हेगारांची नियमित चेकिंग करण्यात येईल. आमचा "वॉच' त्यांच्यावर नेहमीच राहील.
- डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलिस आयुक्‍त.

Web Title: crime news in nagpur