शहरातील देहव्यापार ग्रामीण भागात!

File photo
File photo

नागपूर : महिनाभरात लाखोंची उलाढाल करणारा देहव्यापार शहरापुरता मर्यादित राहिला नसून त्याचे लोन ग्रामीण भागात पसरले आहे. विशेषतः पर्यटनस्थळावरील लॉजसह महामार्गावरील रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठमोठ्या ढाब्यांवर सहजगत्या देहव्यापारासाठी तरुणी उपलब्ध होत आहेत. देहव्यापाराच्या दलदलीत केवळ शहरातील मुलीच नव्हे तर ग्रामीण भागातील शाळकरी मुली तसेच महिलाही सक्रिय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शहरात मोठमोठ्या हॉटेल्समध्ये तसेच लहानसहान लॉजमध्ये देहव्यापारासाठी तरुणी मिळण्याच्या घटना उघडकीस येत आहेत. मात्र, नागपूर पोलिसांनी शहरातील लॉज, हॉटेल्स, ब्यूटीपार्लर, लेडीज जिम आणि किटी पार्टीच्या नावावर सुरू असलेल्या देहव्यापारावर छापासत्र सुरू केले आहे. मात्र, देहव्यापाराचे लोन मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात पोहोचल्याचे समोर आले आहे. दलालांची सेटिंग स्थानिक ठाणेदार व जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाशी जुळल्याची माहिती आहे.
ग्रामीण भागातील पर्यटनस्थळांवर शनिवारी व रविवारी मोठी गर्दी असते. पर्यटनासह हॉटेल, ढाबे आणि लॉजवरील मेजवानीकडे युवावर्ग आकर्षित होत आहे. शहरातील युवक "संडे पार्टी'च्या नावावर ग्रामीण भागाकडे वळत आहेत. रामटेक, नगरधन, कन्हान, रामधाम रोड, काटोल, बुटीबोरी, कामठी, कऱ्हांडला, बाजारगाव, कोंढाळी, मनसर, कुही, झिल्पीसह अन्य ग्रामीण भागातील ढाबे आणि लॉजवर अगदी नवख्या असलेल्या ग्राहकांपर्यंत ग्रामीण भागातील मुलींना दलाल पोहोचवीत आहेत. रामटेक शहरातील काही लॉज आणि ढाब्यांवर ग्राहकांना हेरण्यासाठी दलालांची गर्दी असते. या प्रकाराला ग्रामीण पोलिसांचे अभय आहे. ठाणेदारांच्या आशीर्वादाने हे देहव्यापाराचे अड्डे फुलत आहेत.
कमी वेळात झटपट पैसा
ग्रामीण भागातील महिला दलाल खेड्यातील शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलींना देहव्यापारात ओढतात. कमी वेळात जास्त पैसा कमविण्याचे आमिष दाखवतात. दप्तर घेऊन घराबाहेर पडलेल्या काही विद्यार्थिनी थेट ढाबा किंवा लॉजवर पोहोचतात. सायंकाळ होण्यापूर्वीच घराचा रस्ता पकडतात. महिला दलाल आणि लॉजमालकाच्या संगनमताने खेड्यातील मुलींचेही जीवन बरबाद होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
बारवरही "नाइट पार्टी'
ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत असलेल्या अनेक बारमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावावर देहव्यापार सुरू आहे. रात्री दहा वाजेनंतर अनेक बारला डान्सबारचे स्वरूप येते. बारमध्ये डान्स करण्यासाठी आलेल्या ललनांकडून बारमालक कमिशनवर देहव्यापार करीत आहेत. दारू ढोसण्यासाठी आलेल्या आंबटशौकीन ग्राहकांना बार मॅनेजर तरुणी उपलब्ध करून देत असल्याची माहिती आहे. अशा बारला ग्रामीण पोलिसांचे अभय असल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com