प्रियकराच्या मदतीने पतीचा खून?

File photo
File photo

नागपूर : प्रेमात अडसर ठरत असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने पत्नीने दगडाने ठेचून खून केला. खून केल्यानंतर अपघात झाल्याचा देखावा निर्माण करीत पोलिसांची दिशाभूल केल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला आहे. या प्रकरणी तूर्तास पाचपावली पोलिसांनी केवळ आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पंकज चंद्रकांत अंभोरे (वय 34, रा. व्यंकटेश्‍वरनगर) असे मृत पावलेल्या युवकाचे नाव आहे.
पंकजचे मामा अविनाश जाधव यांनी "सकाळ'ला दिलेल्या माहितीनुसार, पंकज अंभोरे हे एका खासगी कंपनीत क्‍वॉलिटी सुपरवायझर होते. त्यांची काही वर्षांपूर्वी मनीषा (बदललेले नाव) हिच्यासोबत ओळख झाली होती. मनीषाच्या पहिल्या पतीने आत्महत्या केली होती. तर, गुजरातमधील एका व्यापाऱ्याशी दुसरे लग्न केले होते. त्यानंतर पंकज आणि मनीषाचे प्रेमसंबंध निर्माण झाले. मनीषाला तिसरे लग्न धूमधडाक्‍यात करायचे होते. परंतु, पंकजच्या नातेवाइकांनी लग्नास नकार दिला. त्यामुळे त्यांनी गुपचूप लग्न करून एका भव्य इमारतीमध्ये लाखोंचा फ्लॅट विकत घेऊन संसार थाटला. यादरम्यान मनीषाची मैत्री अरुण नावाच्या विवाहित युवकासोबत झाली. दारू पिण्याच्या सवयीची असलेल्या मनीषाची अरुणसोबतची मैत्री दिवसेंदिवस वाढली. मनीषा आणि अरुण यांच्या मैत्रीत पंकज अडसर ठरत होता. त्यामुळे दोघांनीही पंकजचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. कट रचून दगडाने ठेचून खून केला.
पंकजचा मृत्यू नेमका कशामुळे?
पंकज 5 डिसेंबरला रात्री साडेआठ वाजता पाचचाकी वाहनाने जात होता. कामठी रोड, शिल्पा रोलिंग कंपनीसमोर जखमी अवस्थेत मनीषाला दिसला. तिने एका मित्राच्या मदतीने पंकजला मेयोत दाखल केले. तिने डॉक्‍टरला अपघात झाल्याचे सांगितले. त्यानंतर नातेवाईक पोहोचल्यानंतर पंकज नाल्यात पडल्याचे सांगितले. तर, पोलिसांनी विचारणा केल्यानंतर पंकजने स्वतःच डोक्‍यात दगड मारून आत्महत्या केल्याचा दावा केला. मात्र, आतापर्यंत पंकजचा नेमका मृत्यू कशामुळे झाला, याबाबत मनीषा काहीही सांगण्यास तयार नसल्याचे पाचपावली पोलिसांनी सांगितले.
पाचपावली पोलिसांची भूमिका संशयास्पद
पंकज जखमी अवस्थेत आढळल्याची घटना 5 डिसेंबरची आहे. परंतु, पाचपावली पोलिसांनी तब्बल पाच दिवस चालढकल केली. त्यामुळे मृत्यूपूर्व बयाण झाले नाही. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पंकजचे मामा, वडील चंद्रकांत आणि भाऊ सागर यांनी पाचपावलीचे पीएसआय इंगळे यांची भेट घेतली. त्यांच्याकडे मनीषाच्या कृत्याचा पाढा वाचला. मात्र, त्यांनी उलट तक्रारकर्त्यांनाच दमदाटी करीत अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com