बुलेट राजाची वाढतेय दहशत!

अनिल कांबळे
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

नागपूर : शहरातील गल्लीबोळातील चिरकुट गुंडांमध्येही पिस्तूल वापरण्याचे आकर्षण वाढले आहे. छोट्याछोट्या टोळ्यांकडेही पिस्तूल आणि देशी कट्‌टा वापरण्याचे "फॅड' आले आहे. त्यामुळे शहरात अशा गुंडांना हेरून देशीकट्‌टे-पिस्तूल पुरविणाऱ्या टोळ्या कार्यरत झाल्या आहेत. गेल्या चार वर्षांत 164 पेक्षा पिस्तूल पोलिसांनी गुंडांकडून जप्त केल्या आहेत.

नागपूर : शहरातील गल्लीबोळातील चिरकुट गुंडांमध्येही पिस्तूल वापरण्याचे आकर्षण वाढले आहे. छोट्याछोट्या टोळ्यांकडेही पिस्तूल आणि देशी कट्‌टा वापरण्याचे "फॅड' आले आहे. त्यामुळे शहरात अशा गुंडांना हेरून देशीकट्‌टे-पिस्तूल पुरविणाऱ्या टोळ्या कार्यरत झाल्या आहेत. गेल्या चार वर्षांत 164 पेक्षा पिस्तूल पोलिसांनी गुंडांकडून जप्त केल्या आहेत.
शहरातील पोलिसांचा वचक कमी झाल्यामुळे लहानसहान गुंडांच्या टोळ्यांकडे पिस्तूल आणि देशीकट्‌टे आढळत आहेत. अनेक गावगुंड वस्तीत दादागिरी केल्यानंतर स्वतःला मोठा "डॉन' समजून सर्वप्रथम देशीकट्‌टे विकणाऱ्या टोळीचा शोध घेतो. 10 हजारांपासून ते 40 हजार रुपयांपर्यंत सर्वसाधारण कट्‌टा विकल्या जातो. एकदा कट्‌टा विकत घेतला की, वस्तीतील दोन ते तीन टोळ्यांच्या म्होरक्‍यांची भेट घेऊन मांडवली केली जाते. देशीकट्ट्याच्या बळावर शहरात वर्चस्वाचे शीतयुद्ध सुरू होते. यामध्ये कुठेतरी पोलिस ठाण्यातील काही भ्रष्ट पोलिस कर्मचारी चिरीमिरी घेऊन साथ देतात. कुणी पंटरने पिस्तूल असल्याची टीपही दिली तरी त्याला लगेच सतर्क करतात किंवा कारवाई करण्यास टाळाटाळ केली जाते. पोलिसांचे दुर्लक्षित धोरण आणि पिस्तूल विकणाऱ्या टोळ्यांचा शहरात सुळसुळात असल्यामुळेच शहरात बुलेट राजांची दहशत निर्माण होत असल्याची चर्चा आहे.
कोट्यवधींचा "घोडा'बाजार
शहरात देशीकट्ट्यांसह विदेशी पिस्तूलही सहज उपलब्ध होत आहेत. गिट्टीखदान, अजनी, मोमिनपुरा, डोबीनगर, अन्सारनगर, यशोधरानगर, ताजबाग, पाचपावली, गांधीबाग इत्यादी परिसरात "घोडा' विक्री केली जात आहे. अनेक टोळ्या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार येथून कमी पैशात अवैध पिस्तूल नागपुरात आणतात. मध्य प्रदेशातील दावलबेडी, उंडीखोदर, सिरवेल, सिंगनू, अंबा, नवलपुरा आणि सीतापुरा परिसरात शस्त्रे बनविली जातात. हा सर्व कारोबार कोट्यवधींच्या घरात असल्याची चर्चा आहे.
सीमाबंदी तरीही तस्करी
राज्याच्या सीमेवर कडेकोट बंदोबस्त असतानाही शहरात सर्रास शस्त्रविक्री होत आहे. यासाठी पोलिस विभागासह अन्य विभागही जबाबदार आहेत. "सेटिंग' केल्यानंतर शहरात सहज कट्‌टे उपलब्ध होत आहेत. पिस्तूल सापडल्यास आरोपींशी सेटिंग केली जाते. त्याच्याकडून पैसे उकळले जातात. पिस्तूल विक्री करणाऱ्या टोळीपर्यंत पोलिस पोहोचण्याचा कधीच प्रयत्न करीत नसल्याची चर्चा आहे.

 

Web Title: crime news in nagpur