Crime news : चोरांची शक्कल! गॅसकटरने एटीएम मशिन कापून लाखोंची लूट; सराईत टोळीचा कारनामा | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

Crime news : चोरांची शक्कल! गॅसकटरने एटीएम मशिन कापून लाखोंची लूट; सराईत टोळीचा कारनामा

वरुड (अमरावती) : वरुड तालुक्यातील जरुड येथील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने कापूर १६ लाख ४५ हजारांची रोकड लुटारुंनी लंपास केली. संपूर्ण घटना सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिस तपास सुरू आहे. ज्या पद्धतीची घटना घडली त्यावरून सराईतांच्या टोळीचा हा कारनामा असल्याचे स्पष्ट होत आहे.

जरुड येथे भारतीय स्टेट बँकेची शाखा व एटीएम सुद्धा आहे. गुरुवारी (ता. ११) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोघेजण एटीएम फोडत असून बाहेर ०४२३-२५२० या क्रमांकाची लाल रंगाची कार उभी असल्याचे दिसून येत आहे. रक्कम हस्तगत केल्यावर त्याच कारने दोघेही पसार झाले. व्यवस्थापक पवन भोकरे यांच्या तक्रारीवरून वरुड पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

सायरन वाजल्याने यंत्रणेच्या हालचाली

एटीएमच्या देखभालीचे काम मुंबई येथील कंपनीकडून केल्या जाते. त्यात सायरन सिस्टीम बसविण्यात आली आहे. गैरप्रकार झाल्यास मुंबई येथील मुख्यालयात त्याची सूचना मिळते. गुरुवारी सायरन वाजताच संबंधित कंपनीने तातडीने बँकेचे शिपाई किशोर बेलसरे यांना कळविले. शिपायाने जागा मालक विलास दिवराळे यांना माहिती दिली. त्यांनी एटीएमकडे धाव घेतली. तोपर्यंत लुटारू पसार झाले होते. असे पवन भोकरे यांनी सांगितले. (Breaking Marathi News)

सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रेचा वापर

दोघे जण एटीएम सेंटरच्या आत शिरल्यानंतर त्यांनी गॅसकटरनचा वापर करण्यापूर्वी आतील दोन्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारुन कॅमेरा नादुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही चोरीचे चित्रीकरण झाले.

पाच पोलिस पथकांचे गठण

या खळबळजनक घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हेशाखा व वरुड ठाणे यांचे प्रत्येकी दोन तर, सायबर ठाण्याचे एक अशी पाच पथके गठित करून तपास सुरू करण्यात आला. रेकॉर्डवरील अनेकांची तपासणी केली. राज्यातील सर्वच पोलिस ठाण्याला जरुडच्या घटनेची माहिती देण्यात आली. असे स्थानिक गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक तपन कोल्हे यांनी सांगितले.

टॅग्स :Crime NewsATM MachineSBI