गुन्हेगारांवर कारवाईचा धडाका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

आगामी लोकसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी शहर पोलिस दलाने तीन महिन्यांपासून तयारी केली होती. गेल्या तीन महिन्यांत तब्बल ४ हजार ६१ गुन्हेगारांवर कारवाई केली. तर अनेक गुन्हेगारांवर पोलिसांचा ‘वॉच’ आहे. पोलिस आयुक्‍तांच्या आक्रमक पवित्र्यामुळेच निवडणुकीच्या काळातही शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम आहे.

नागपूर - आगामी लोकसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी शहर पोलिस दलाने तीन महिन्यांपासून तयारी केली होती. गेल्या तीन महिन्यांत तब्बल ४ हजार ६१ गुन्हेगारांवर कारवाई केली. तर अनेक गुन्हेगारांवर पोलिसांचा ‘वॉच’ आहे. पोलिस आयुक्‍तांच्या आक्रमक पवित्र्यामुळेच निवडणुकीच्या काळातही शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम आहे.

लोकसभा निवडणुकीत पोलिसांवर सुरक्षाव्यवस्थेची मोठी जबाबदारी आहे. नागपूर शहराची पार्श्‍वभूमी लक्षात घेता पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी जानेवारी महिन्यापासूनच तयारी सुरू केली होती. शहरातील प्रत्येक गुन्हेगाराची ‘कुंडली’ काढण्याचे आदेश आयुक्‍तांनी दिले. त्यामुळे शहरातील प्रत्येक गुन्हेगारावर ‘वॉच’ ठेवण्यात आला. गुन्हेगारी जगातात सक्रिय असणाऱ्या अनेकांना तडीपार करण्यात आले, तर काहींना थेट मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध (एमपीडीए) करण्यात आले. जवळपास २,३०० गुन्हेगारी प्रवृत्तींच्या युवकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. जवळपास एक हजार जणांवर दारूबंदी कायद्याअंतर्गत पोलिसांनी कारवाई केली, तर जुगार खेळणाऱ्या ५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. पोलिसांनी धडाकेबाज कारवाईचा धसका शहरातील गुन्हेगारांनी घेतला आहे. दरम्यान, गुन्हे शाखेनेही शहरात कारवाईचा जोर वाढवला आहे. गुन्हे शाखेच्या पथकांनी चोरट्यांच्या टोळ्या, गुन्हेगारांच्या टोळ्या तसेच दरोडा टाकण्याच्या तयारी करणाऱ्या टोळ्यांवर मोठा अंकुश ठेवला आहे. त्यामुळे शहरातील घरफोडी, लूटमार आणि चोऱ्यांचे प्रमाण खूप कमी झाले.

शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिस सज्ज आहेत. गुन्हे शाखेच्या कारवाईच्या धडाक्‍यामुळे गुन्हेगारांमध्ये धडकी बसली आहे. आगामी निवडणुकांमध्ये कोणत्याही अडचणी येणार नाही, याची आम्ही व्यवस्था केली आहे. गुन्हे शाखेचा कारवाईचा धडाका यापुढेही असाच कायम ठेवणार आहे.
- नीलेश भरणे, पोलिस उपायुक्‍त, (गुन्हे शाखा)

Web Title: Criminal Crime Police