अखेर कुख्यात शेखूला अटक

अखेर कुख्यात शेखूला अटक

नागपूर : पिस्तुलाच्या धाकावर मद्य व्यावसायिकाचे अपहरण करून 10 लाखांची खंडणी उकळणारा कुख्यात गुंड शेखू खान व त्याच्या चार साथीदारांना गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. शेखूकडून पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसेही हस्तगत करण्यात आली आहेत. यापूर्वी शेखूच्या मैत्रिणीसह तिघांना याच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. 
शेखू ऊर्फ गुलनवाज खान इजाज खान (29) रा. उत्थाननगर, सूरज चौधरी (25) रा. बालाजीनगर, अथर्व खडाखडी (23) रा. हिंदुस्थान कॉलनी, परवेश गुप्ता (26) रा. राजीवनगर खदान आणि चिडी ऊर्फ अजय मेश्राम (28) रा. संजयनगर, पांढराबोडी अशी अटकेतील गुंडांची नावे आहेत. यापूर्वी 4 ऑक्‍टोबरला शेखूचे साथीदार शिवा ऊर्फ शिवप्रसाद बेनक्कीवार (29) रा. अकोली (बु.), पांढरकवडा, आकाश चव्हाण (27) रा. केळापूर, घाटंजी आणि स्नेहल पीटर (32) रा. ख्रिश्‍चन कॉलनी, चंद्रपूर यांना अटक करण्यात आली होती. मनीषनगरातील रहिवासी प्रशांत आंबटकर (36) यांचा मद्याचा व्यवसाय आहे. 26 ऑगस्ट रोजी आरोपींनी पिस्तुलाचा धाक दाखवीत शंकरनगर चौकातून त्यांचे कारमधून अपहरण केले. वाहनातच बेदम मारहाण करीत 10 लाखांच्या खंडणीची मागणी केली. भीतीपोटी प्रशांत त्यांना आपल्या घरी घेऊन गेला. 10 लाखांची रोख आरोपींच्या हातात देऊन स्वत:ची सुटका करून घेतली. या घटनेने प्रशांत कमालीचा घाबरला, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 
प्रशांतच्या तक्रारीवरून 4 सप्टेंबर अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पण, घटनेनंतरच आरोपी पसार झाले होते. गुन्हेशाखेच्या युनिट 2 कडे प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला होता. आरोपींना पळण्यासाठी मदत केल्याच्या कारणावरून स्नेहल तसेच अन्य दोन आरोपींना प्रारंभी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 9 लाख 31 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. मुख्य सूत्रधार शेखूला पकडण्यासाठी पथकाचे प्रयत्न सुरूच होते. शुक्रवारी दुपारी शेखू व त्याचे साथीदार वेस्ट हायकोर्ट मार्गावरील बटुकभाई ज्वेलर्सच्या गल्लीत येणार असल्याची विश्‍वसनीय माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा रचून आरोपींच्या मुसक्‍या आवळल्या. अंगझडतीत शेखूजवळ पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे आढळली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com