धर्मशक्तीपुढे अर्थवादी चळवळ लोपपावल्याने शेतीपुढे संकट!

मनोज भिवगडे
Thursday, 6 February 2020

‘सकाळ’ कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून विदर्भातील शेतकऱ्यांसाठी लढा उभारण्याची घोषणा केली.

अकोला : राज्यात 90 च्या दशकात शेतकरी चळवळ रुजली. ही चळवळ मुळात अर्थवादी होती. काळासोबत धर्मशक्तीने डोके वर काढले. जेव्हा धर्मशक्ती पुढे येते तेव्हा अर्थवादी चळवळ लोप पावते. शेतकरी चळवळीसोबतही हेच झाले. आज विदर्भातील शेतकऱ्यांना चळवळीची गरज आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी मला साथ द्यावी, त्यांच्या मागे कार्यकर्त्यांची फौज लावण्याचे काम मी करेल, असे आश्‍वासक मत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

 

‘सकाळ’ वऱ्हाड आवृत्तीच्या अकोला कार्यालयात बुधवारी सायंकाळी दिलेल्या सदिच्छा भेटीत ‘सकाळ’च्या विविध विभागातील सहकाऱ्यांसोबत त्यांनी संवाद साधताना हे मत व्यक्त केले. यावेळी स्वाभीमानीचे माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अमोल हिप्परके, स्वाभीमानी संघटनेचे अकोला जिल्हाध्यक्ष गणेश खुमकर, स्वाभीमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी, दीपक ताले, अमोल जाधव, वैभव पाटेकर आदींची उपस्थिती होती. सकाळ वऱ्हाड आवृत्तीचे निवासी संपादक संदीप भारंबे यांनी राजू शेट्टी यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. त्यानंतर ‘सकाळ’च्या विविध विभागातील सहकाऱ्यांसोबत मनमोकळा संवाद साधताना राजू शेट्टी यांनी शेतकरी चळवळ पुन्हा रुजविण्यासाठी ‘स्वाभीमानी’चे संघटन मजबूत करण्याच्या दिशेने पावले टाकण्यात येत असल्याचे सांगितले. येत्या 22 फेब्रुवारीला शिर्डीत होणाऱ्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत नव्याने पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी चळवळ मजबूत करण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरची लढाई लढण्याची ही तयारी असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. सिंचनाचा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी पाण्याचे दुर्भिक्ष बघून त्याप्रमाणे सबसिडीची वाढ करणे आवश्‍यक आहे. शिवाय त्याप्रमाणे पीक घेण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याची गरज असल्याचेही शेट्टी म्हणाले.

विश्‍वासाला तडा गेला
भाजप सरकारकडून झालेला विश्‍वासघात आणि शेतकऱ्यांकडे झालेले दुर्लक्ष बघता नव्या सरकारकडून अपेक्षा होत्या. मात्र या सरकारकडूनही विश्‍वासाला तडा गेला. कर्जमाफी तकलादू आहे. शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांचीही भाषा बदलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुणाकडे बघावे, असे शेट्टी म्हणाले.

पीक विमा झाला ‘पीएम कॉर्पोरेट’!
संकटाच्या काळात पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या कामी आली नाही. ही योजना म्हणजे पीएम कॉर्पोरेट योजना झाली. कंपन्यांकडेच पैसा गेला. भ्रष्टाचाराची कीड लागली. खोटे रेकॉर्ड तयार करण्यात आले. पाच-सहा वर्ष नफा कमावला. शेतकऱ्यांना फायदा देण्याची वेळ आली तेव्हा हात वर केले. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तर या कंपन्या येण्यासही तयार नाहीत. नफा कमाविणाऱ्या या कंपन्यांची चौकशी करून मागचे हिशोब विचारायला हवे, असे राजू शेट्टी म्हणाले.

दोन हजार, ही निवडणुकीपूर्वीची लाच !
शेतकरी सन्मान योजनेच्या नावाखाली निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा करण्याची घोषणा केली. मात्र ही योजनाही फसवी निघाली. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेली ही लाच होती, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला.

खरा लाभार्थी थकीत नाही
कर्जमाफी योजना ही खऱ्या लाभार्थींसाठी नाही हेच सरकारला समजले नाही. जे शेतकरी एका लाखापर्यंत शून्य टक्के व्याजावर कर्ज घेतो, तो त्याचा लाभ मिळविण्यासाठी नियमित त्याची परतफेडही करतो.त्यामुळे तो कधीच थकीत राहत नाही आणि हाच खरा कर्जमाफीचा लाभार्थी आहे. त्यालाच खऱ्या अर्थाने कर्जमाफीची गरज आहे. हेच सरकारच्या लक्षात येत नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

शेतकरी नेटवर्क उभारणे आवश्‍यक
शेती मालावर प्रक्रिया झाली पाहिजे. केवळ प्रक्रिया करून भागणार नाही तर त्यासाठी शेतकऱ्यांनीच त्यांच्यासाठी नेटवर्क उभारणे आवश्‍यक आहे. त्यासाठी शेतीत नॅनो तंत्रज्ञानावर आधारीत प्रक्रिया उद्योग शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून उभारले गेले पाहिजे, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.

गोठा हरवला अन् शेतीचे तंत्र बघिडले
विदर्भात पशू पालनाकडे दुर्लक्ष झाले. चाऱ्या-पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या दारातील गोठा हळूहळू हरवत चालला आहे. त्यातूनच विदर्भातील शेतीचे तंत्र बिघडले आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसायाला चालणा देण्याची गरज असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.

टेक्सस्टाईल पार्क उभे व्हावे ः रविकांत तुपकर
विदर्भातील कापूस उत्पादकांसाठी या भागात नऊ टेक्सस्टाईल पार्कचा प्रस्ताव होता. त्यासाठी आधी चिखली व नंतर खामगाव येथे पार्कच्या निर्मितीला मान्यता दिली. त्याचे संचालन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्यग महामंडळातर्फे करण्यात येणार होते. मात्र पैसाच महामंडळाला दिला नाही. हे प्रस्ताविक टेक्सस्टाईल पार्क सुरू झाले पाहिजे. त्यामुळे विदर्भातील कापूस उत्पादकांना दिलासा मिळू शकेल, असे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्यग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crisis before agriculture due to the loss of economic movement