अमरावती विभागात सोयाबीन, कपाशी, तूर जोमात

File photo
File photo

अमरावती : विभागात खरिपातील पिकांची स्थिती गत दहा वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वांत चांगली आहे. यवतमाळ व वाशीम जिल्ह्यांचा अपवादवगळता इतर जिल्ह्यांमध्ये जर आता सतत पाऊस पडला, तर तो पिकांसाठी धोकादायक ठरू शकतो. पावसाच्या पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीतील पिकांची पाने पिवळी पडण्याची शक्‍यता आहे.
या खरीप हंगामात अमरावती विभागात सोयाबीन, कपाशी आणि तूर पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे. विभागात बुलडाणा जिल्ह्यातील पीकपरिस्थिती सर्वाधिक उत्तम आहे. अमरावती व अकोला जिल्ह्यात पर्जन्यमान समाधानकारक आहे, तर यवतमाळ व वाशीम जिल्ह्यात कमी आहे. विभागात 26 जूनदरम्यान पावसाने हजेरी लावली. मूग, उडदाच्या पेरणीपर्यंत पाहिजे तसा पाऊसच न झाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन, कपाशी आणि तुरीला प्राधान्य दिले. जुलैमध्ये पावसाने सर्वत्र हजेरी लावली. त्यानंतर ठरावीक अंतराने पर्जन्यमान कायम राहिले. त्यामुळे खरिपातील पिके चांगलीच बहरली आहेत. पिकांची ही उत्तम स्थिती दहा वर्षांनंतर पाहायला मिळत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नदी-नाल्यांचे खोलीकरण, शेततळे, सिमेंटनाला बंधारे या माध्यमातून पाण्याचा साठा निर्माण होऊन जमिनीतील ओलावा कायम राहिला. कपाशीवर काही प्रमाणात हिरव्या अळींचे, तर काही ठिकाणी शेंदरी व गुलाबी बोंडअळीचा असलेला प्रादुर्भाव नियंत्रणात आहे.
सोयाबीनला धरलेल्या शेंगा परिपक्व होत आहेत. सोयाबीनची काढणी व पावसाची परतीची वेळ यांच्यात मेळ साधल्यास शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकला जाऊ शकतो. सद्यस्थितीने संपूर्ण पीकस्थितीला कोरड्या दुष्काळाच्या छायेतून बाहेर काढले आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूररेल्वे, धामणगावरेल्वे, चांदूरबाजार, धारणी आणि चिखलदरा, अकोला जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, अकोट, तेल्हारा आणि बाळापूर, तर बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा, मलकापूर आणि संग्रामपूर या तालुक्‍यांनी वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी ओलांडली आहे.

अमरावती विभागातील पीकस्थिती उत्तम आहे. सततच्या पावसाने अनावश्‍यक फवारणीला आळा बसलेला आहे. मात्र, पाऊस असाच कायम राहिल्यास पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीतील पिकांची पाने पिवळी पडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.
- सुभाष नागरे,
विभागीय कृषी सहसंचालक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com