पीक परिस्थिती यंदा सर्वसाधारण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 एप्रिल 2017

भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज; मोदींसाठी "बुरे दिन'

भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज; मोदींसाठी "बुरे दिन'
खामगाव (जि. बुलडाणा)  - बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील घटमांडणीच्या भाकिताला तीनशे वर्षांची परंपरा आहे. शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास सारंगधर महाराज आणि पुंजाजी महाराज यांनी यंदाचे भाकीत जाहीर केले. अतिवृष्टीच्या आपत्तीसह यंदा पीक परिस्थिती सर्वसाधारण राहील. घुसखोरी वाढणार असून जवानांची धावपळ होईल. शिवाय "राजा' अर्थात पंतप्रधान कायम राहणार असले, तरी देशासमोरील आर्थिक संकटांची टांगती तलवार पाहता नरेंद्र मोदींसाठी "बुरे दिन' येण्याचे त्यांनी सूचित केले आहे.

भेंडवळची घटमांडणी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर करण्यात आली. सूर्यास्तापूर्वी गावाबाहेरील नरहरी वाघ यांच्या शेतात चंद्रभान महाराजांचा जयजयकार करीत घटाची आखणी करण्यात आली. यंदाच्या पावसाळ्यात पहिला महिना साधारण आणि लहरी स्वरूपाचा राहील. दुसरा, तिसरा महिना चांगला पाऊस, तर चौथ्या महिन्यात कमी पाऊस सांगितला आहे. देशावर आर्थिक संकट येणार असल्याचे भाकित वर्तविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे देशाच्या संरक्षण खात्याची जबाबदारी वाढणार असून, परकीय घुसखोरीच्या डोकेदुखीचे आव्हान कायम राहणार आहे, त्यामुळे जवानांची धावपळ वाढणार असल्याचे पुंजाजी महाराज यांनी अंदाजात म्हटले आहे.

देशावरील संकटांची मालिका पाहता पंतप्रधान नरेंद्र मोंदीसाठी हे वर्ष "बुरे दिन'चे असल्याचे भाकितही वर्तविण्यात आले आहे. येत्या हंगामामध्ये मृग नक्षत्रात जून महिन्यामध्ये लहरी पाऊस, जुलै महिन्यात थोडा जास्त, ऑगस्टमध्ये चांगला, तर सप्टेंबर महिन्यात कमी पाऊस पडणार असला, तरी अवकाळी स्वरूपाचा अंदाज आहे. विदर्भातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक असलेल्या कपाशीचे पीक यंदा चांगले येणार असल्याचे सांगण्यात आले. खरिपात पिकांचा राजा समजल्या जाणाऱ्या ज्वारीचे पीक चांगले येईल. खरिपाचा हंगाम चांगला राहण्याचे भाकित आहे.

मोदींवर असे येणार संकट
घटामधील सुपारी पानावर बाजूला पडलेली होती व पान दुमडले गेले असून त्यावर माती होती. त्यामुळे "राजा' कायम राहणार आहे. गादीवर माती असल्याने राजावर राजकीय संकटे येऊन राजकीय क्षेत्र ढवळून निघणार आहे, असे भाकित वर्तविण्यात आले. घटामध्ये ठेवलेल्या करंजीचे (कानोला) तुकडे झालेले आढळले, त्यामुळे देशावर यंदा आर्थिक संकट ओढवणार आहे. काही वर्षांपूर्वीही आर्थिक संकटाचे भाकित खरे ठरले होते.

Web Title: crop condition normal in this year