विघ्नहर्ता, शेतकऱ्यांना तुच तार!

कोंढाळी - उद्‌ध्वस्त झालेले पीक.
कोंढाळी - उद्‌ध्वस्त झालेले पीक.

कोंढाळी - कोंढाळी-काटोल तालुक्‍यातील संत्रा उत्पादक मेटाकुटीस आला आहे. संत्रा उत्पादकांना आर्थिक मदतीविषयी सरकारी पातळीवर हालचाली झालेल्या दिसत नाही. काटोल येथील संत्रा प्रक्रिया केंद्र ही बंद अवस्थेत आहे. सिंचनाची अपुरी व्यवस्था, अशा अवस्थेत संत्रा उत्पादक शासनाकडे वारंवार विनवणी करून दमला आहे. म्हणून विघ्नहर्ता, गणेशा शासनाला सुबुद्धी दे, अशी प्रार्थना करण्याची वेळ शेतकऱ्यावर येऊन ठेपली आहे.   

उत्पादनवाढीसाठी व प्रक्रिया उद्योगांसाठी सरकारने पॅकेज द्यायला हवे, पण याकडे सरकारचे  लक्षच नाही. दुष्काळी परिस्थितीमुळे सुकलेल्या संत्रा बागांच्या नुकसानभरपाईपोटी हेक्‍टरी  आर्थिक मदत मिळावी, या वर्षी मृगबहार न आल्यामुळे संत्रा बागेचे सर्वेक्षण करून हेक्‍टरी २५ हजार रुपयांची मदत मिळावी, डिंक्‍या निर्मूलनासाठी प्रतिहेक्‍टरी सुधारित पॅकेज द्यावे, सिटस इस्टेटची अंमलबजावणी करावी, सूक्ष्मसिंचनासाठी केंद्राने अनुदान द्यावे, संत्रा उत्पादनापासून तंत्रज्ञान, पणन प्रक्रियापर्यंतचे जाळे एडीडीबी किंवा कंपन्यांच्या सहकार्याने तयार करावे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गतच्या प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या बळकटीकरणासाठी ठोस निर्णय घेऊन मोर्शी, वरूड तालुक्‍यात संत्रा उत्पादकांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन केंद्र म्हणून कृषी चिकित्सालय सुरू करावे, फळ पीकविम्याची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी, आदी मागण्या कोंढाळी येथील माजी सरपंच सुरेंद्रसिंह व्यास, काटोलचे माजी उपसापती अनुप खराडे, निळकंठराव ढोरे, प्रा. ठाकरे, महेंद्र ठवळे, सतीश चव्हाण, प्रकाश बारंगे, बिपीन देवतळे, याकूब पठाण, पृथ्वीराज फिस्के, किशोर रेवतकर, रमेश वंजारी, रवी जायसवाल, अरुण खोडणकर, नीलेश दुबे यांनी केली.

पेयजलाचे संकट 
जाम मध्यम प्रकापात आजच्या घडीला फक्त १६.००टक्‍केच जलसाठा आहे. यामुळे काटोल तालुक्‍याचे काटोल-कोंढाळी व एमआयडीसी काटोलला पेयजलाच्या संकटालाही सामोरे जावे लागणार असे दिसते.

शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे संत्रा व मोसंबी उत्पादक वाऱ्यावर आहेत. 
- महेश गोडबोले, शेतकरी

संत्र्यावर रोगांचा प्रादुर्भाव झाला. सरकारकडून यावर्षी अनुदान मिळाले नाही. खतही महाग झाले आहे. शासनाची बांधावर खत पुरविण्याची घोषणा फोल ठरली. नरखेड व काटोल तालुक्‍यातील हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी फळ पीकविमा काढूनसुद्धा विम्याची मदत मिळाली नाही.
- महेंद्र ठवळे, संत्रा उत्पादक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com