पावसाचा हाहाकार! अमरावती जिल्ह्यात तब्बल दोन लाख हेक्‍टर क्षेत्रातील पिके उद्‌ध्वस्त 

crops over two lakh hectors get affected due to heavy rain
crops over two lakh hectors get affected due to heavy rain

अमरावती ः सप्टेंबरमधील संततधार पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घासच हिरावून घेतल्याचे महसूल विभागाच्या अहवालाहून दिसून आले आहे. जिल्ह्यातील तब्बल 1 लाख 98 हजार 812 हेक्‍टर क्षेत्रातील पिके उद्‌ध्वस्त झाली असून 42 हजार 850 हेक्‍टर क्षेत्र खरडून गेले आहे. खरिपातील पिकांची अतोनात हानी झाली असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

यंदा मॉन्सूनचे आगमन लवकर झाल्याने शेतक-यांनी पेरणीही लवकर आटोपली. जिल्ह्यात 6 लाख 80 हजार 740 हेक्‍टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली असल्याचा कृषी विभागाचा अंतिम अहवाल आहे. यामध्ये मूग 15,929, उडद 4933, कापूस 2 लाख 44 हजार, सोयाबीन 2 लाख 69 हजार 659 व तूर 1 लाख 6 हजार 135 हेक्‍टर क्षेत्रात पेरण्यात आली आहे. 

सोयाबीन पिकाच्या उगवणीपासूनच तक्रारी होत्या. त्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबरमधील पावसाने त्यावर संकट आणले. या दोन महिन्यातील संततधार पावसाने सर्वच पिकांची अतोनात हानी केली. मूग, उडीद तर हातातून गेलेच, मात्र नंतर सोयाबीनवरही विपरीत परिणाम झाला.

1 जून ते 18 सप्टेंबरपर्यंत झालेल्या नुकसानीचा अंदाज महसूल विभागाने काढला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 1 लाख 98 हजार 812 हेक्‍टर क्षेत्रातील पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान मूग, उडीद व सोयाबीनचे झाले. मूग व उडीद हातून गेल्याची स्थिती आहे, तर सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटले आहेत. कापसालाही पावसाचा मोठा फटका बसल्याचे अहवालात आहे.

पावसामुळे सर्वाधिक नुकसान पिकांचे नुकसान अमरावती तालुक्‍यात झाल्याचे अहवालात नोंद आहे. या तालुक्‍यातील 31 हजार 943 हेक्‍टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून त्या खालोखाल वरुड 29,970, धामणगावरेल्वेतील 28,034, चांदूररेल्वेतील 20,679 व मोर्शी तालुक्‍यातील 19 हजार 277 हेक्‍टर पीक उद्‌ध्वस्त झाले आहे.

42 हजार हेक्‍टर जमीन खरडली

काही भागांतील शेतजमीनच खरडून गेल्याने पिकांसह जमिनीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 42 हजार 850 हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले आहे. या जमिनीवर अधिकांश प्रमाणात सोयाबीनची पेरणी होती. दर्यापूर तालुक्‍यातील 25,154, चांदूरबाजारमधील 16,225, मोर्शीतील 124, अमरावतीमधील 713, भातकुलीतील 530, धामणगावरेल्वेतील 52, अजनगावसुर्जीतील 50 हेक्‍टर जमीन खरडून गेली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com