अरे बाबा, लॉकडाउन आहे... कशाला गर्दी करताय?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 April 2020

त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा नियम बॅंकांसमोर सर्रास पायदळी तुडविला जात आहे. ग्राहक आणि बॅंक व्यवस्थापन याबाबत कोणतीच काळजी घेत नसल्याने आज महागाव शहरातील स्टेट बॅंकेचे दोन सीएसपी सेंटर आणि मध्यवर्ती बॅंकेच्या शाखेवर तहसीलदार नीलेश मडके आणि मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांनी कारवाई केली. सीएससी सेंटरचे संचालक आशीष लक्ष्मण दमकोडावार, रवी दीपक सुरोशे आणि जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे शाखा व्यवस्थापक यांना प्रत्येकी दोन हजाराचा दंड ठोठावण्यात आला.

महागाव (जि. यवतमाळ) : कोरोना विषाणूच्या थैमानामुळे जिल्ह्यात आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचीही पायमल्ली होताना दिसत आहे. विशेषतः बॅंकांसमोरील गर्दीने सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णतः फज्जा उडाला आहे. या संस्थांना ताळ्यावर आणण्यासाठी प्रशासनाने आज महागाव शहरातील 3 बॅंकांवर दंडात्मक कारवाई केली. यात स्टेट बॅंकेचे 2 सेवा केंद्र आणि जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या महागाव शाखेचा समावेश आहे.

सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाला हरताळ फासणाऱ्या बॅंकांवर दंडात्मक कारवाईची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन घोषित करण्यात आल्यामुळे रोजगारापासून वंचित असलेल्या गोरगरिबांच्या जनधन खात्यात दरमहा 500 रुपये असे एकूण दीड हजार रुपये टाकण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. परंतु, ही तुटपुंजी रक्कम काढण्यासाठीही बॅंकांसमोर ग्राहकांची विक्रमी गर्दी होत आहे.

बॅंकांसमोरच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा 
त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा नियम बॅंकांसमोर सर्रास पायदळी तुडविला जात आहे. ग्राहक आणि बॅंक व्यवस्थापन याबाबत कोणतीच काळजी घेत नसल्याने आज महागाव शहरातील स्टेट बॅंकेचे दोन सीएसपी सेंटर आणि मध्यवर्ती बॅंकेच्या शाखेवर तहसीलदार नीलेश मडके आणि मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांनी कारवाई केली. सीएससी सेंटरचे संचालक आशीष लक्ष्मण दमकोडावार, रवी दीपक सुरोशे आणि जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे शाखा व्यवस्थापक यांना प्रत्येकी दोन हजाराचा दंड ठोठावण्यात आला. जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांसमोरही ग्राहकांच्या रांगा लागत असून सोशल डिस्टन्सिंगचा नियम तोडणाऱ्यावर उद्यापासून दंडात्मक कार्यवाही केली जाणार आहे. 

भरभरून पिकलाय संत्रा; शेतक-यांचे खिसे मात्र रिकामेच
 

प्रतिबंधात्मक उपाययोजनेतील हयगय भोवली 
बॅंक किंवा इतर ठिकाणी गर्दी होऊ नये, याची काळजी व्यवस्थापनाने घ्यावयाची आहे. परंतु, अनेक ठिकाणी व्यवस्थापनच लक्ष देत नसल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. यामुळे कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. अशा तीन व्यवस्थापनाला प्रशासनाने दंड ठोकला आहे. त्यांनी पुन्हा हयगय केली तर मोहीम राबविण्यात येईल, असा इशाराही प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crowd in bank in lockdown