बापरे! किती हे लोंढे? कुणी वाहनाने, तर कुणी पायदळ 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

लॉकडाउन देशात कायम असला, तरी परराज्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी शिथिलता देण्यात आली. यामुळे तेलंगणात अडकलेले महाराष्ट्रातील सुमारे चार हजार मजूर रविवारी चंद्रपूर जिल्ह्यात पोडसा सीमेवर आले.

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर)  : परराज्यातील मजुरांना परत आणण्याचा केंद्र शासनाने निर्णय घेतला. त्यानंतर राज्य शासनाने त्यांना आणण्यासाठी नियोजन सुरू केले. मात्र, त्याआधीच तेलंगणातील हजारो मजुरांचे लोंढे आपआपल्या सोईने सीमावर्ती भागातील पोडसा गावात पोहोचले. याची माहिती कळताच प्रशासनाची तारांबळ उडाली. मात्र, पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी खासगी बसची व्यवस्था करून रविवारी हजारो मजुरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात आले. पण, अद्यापही हजारो मजूर गावाकडे पोहोचण्यासाठी आतूर आहेत. शेतातच डेरा टाकून ते स्वयंपाक बनवीत आहेत. 

लॉकडाउन देशात कायम असला, तरी परराज्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी शिथिलता देण्यात आली. यामुळे तेलंगणात अडकलेले महाराष्ट्रातील सुमारे चार हजार मजूर रविवारी चंद्रपूर जिल्ह्यात पोडसा सीमेवर आले. तेलंगणा सरकारने या मजुरांना जाण्याची परवानगी दिली. मात्र, वाहनांची कोणतीही व्यवस्था केली नाही. त्यामुळे पदरचे पैसे खर्च करून या मजुरांनी भाड्‌याने वाहने केली आणि सीमेपर्यंत आले. गोंडपिंपरी तालुक्‍यातील पोडसा पुलावरून हे सर्व मजूर रविवारी महाराष्ट्रात म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाले. 

अवश्य वाचा-  लॉकडाउनने बैलबाजार बंद केला हो! कशी होणार मशागतीची कामे? 

मिरची तोड करण्यासाठी तेलंगणात हजारो मजूर दरवर्षी जातात. पण यावेळी कोरोना संकटामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले. या लोकांना गावाबाहेर राहावे लागले. लहान-लहान मुलं घेऊन या लोकांनी दीड महिना तेलंगणात कसातरी घालवला. आता आपल्या राज्यात परतल्यावरही त्यांच्या यातना कमी होताना दिसत नाही. अंगाची लाही लाही करणाऱ्या कडक उन्हात हे लोक डोक्‍यावर ओझं आणि खांद्यावर मुलांना घेऊन पायदळ आपल्या गावाकडे निघाले आहेत. उन्हापासून बचावासाठी ते कधी झाडाखाली तर कधीबसस्थानकात आश्रयाला आहेत. असे अनेक मजूर-कामगार तेलंगणातून महाराष्ट्रात येण्यासाठी निघाले असून, सीमेवर मदतीची वाट बघत आहेत. 

25 हजार मजूर तेलंगणात 

राज्यातील सुमारे 25 हजार मजूर तेलंगणात गेले आहेत. ते आपल्या परीने येत आहेत. अशातच रविवारी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, राजुरा विधानसभा मतदार संघाचे आमदार सुभाष धोटे यांचा ताफा दुपारनंतर पोडसा सीमेवर धडकला. राज्याच्या सीमेवर जमलेल्या गर्दीचे त्यांनी सांत्वन केले. अखेर जमलेल्या मजुरांना स्वगृही परतण्यासाठी मदत करणार असल्याचे पालकमंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले व प्रशासनाला प्रत्येक मजुराची जेवणाची व्यवस्थादेखील करण्याचे आदेश दिले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crowd of peoples came from Telangana with Vehicles and by walk