पुलवामा हल्ला : के तूम बीन ये घर सुना, सुना है..! 

Sanjay Rajput
Sanjay Rajput

नागपूर : "सीआरपीएफ'मध्ये तेवीस वर्षे देशाची सेवा केल्यानंतर श्रीनगरचे पोस्टिंग मिळाले तेव्हा संजय राजपूत (45) आनंदित होते. पण काश्‍मीर सीमेवरील सततच्या तणावपूर्व वातावरणामुळे पत्नी आणि आईला चिंता होती. मात्र सर्वांना धीर देत संजय 12 फेब्रुवारीला पहाटे जम्मूच्या दिशेने रवाना झाले. दोनच दिवसांत त्यांना वीरमरण आल्याची बातमी कुटुंबीयांना कळली आणि आभाळ कोसळल्यागत सारे स्तब्ध झाले. ज्या घराच्या नजरा संजय यांच्या प्रतीक्षेत असायच्या, त्यात आज न संपणारे अश्रू होते. नुसती शांतता नव्हे, स्मशान शांतता होती ! 

"सीआरपीएफ' कॅम्पमध्ये संजय राजपूत यांचे 219 क्रमांकाचे क्वार्टर आहे. या ठिकाणी ते पत्नी सुषमा (38) तसेच मुले जय (12) आणि शुभम (11) यांच्यासोबत राहायचे. बारा वर्षे ईशान्येकडील राज्यांमध्ये आणि सहा वर्षे छत्तीसगडमध्ये सेवा दिल्यानंतर गेल्या साडेचार वर्षांपासून ते नागपूरच्या "सीआरपीएफ' कॅम्पमध्ये 213 व्या बटालियनमध्ये होते. एकूण 23 वर्षांची सेवा झाली. काही दिवसांपूर्वीच त्यांना श्रीनगरला पोस्टिंगचा ऑर्डर मिळाली आणि 115 व्या बटालियनला रुजू होण्यासाठी ते नागपुरातून रवाना झाले. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांचे मोठे भाऊ राजेश यांनी संपर्क केला, तेव्हा जम्मूहून श्रीनगरकडे रवाना झाले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात संजय यांना वीरमरण आले. 

साऱ्या देशात ही बातमी वायुवेगाने पसरली. हुतात्म्यांच्या नावाची यादी फिरू लागली. राजेश यांनी खात्री केल्यानंतर ते शेगावहून नागपुरात दाखल झाले. वीरपत्नी सुषमा यांना रात्रभर सांगायचे नाही, असा निर्णय झाला. पण तोपर्यंत सांत्वनासाठी अधिकारी आणि आप्तेष्टांची गर्दी होऊ लागली. "तुझ्या नवऱ्याला वीरमरण आले आहे,' हे सांगण्याची हिंमत नातेवाइकांनी कशीबशी केली आणि त्यानंतर काय झाले, हे शब्दांतही मांडणे अवघड ठरावे. 

दुसराही भाऊ गेला 
पाच भावंडांमध्ये संजय हे तिसऱ्या क्रमांकाचे. राजेश हे सर्वांत मोठे भाऊ असून ते शेगावला मंडल अधिकारी आहेत. बहीण सुरतला असते. संजयपेक्षा लहान असलेल्या एका भावाचा अपघात झाल्यामुळे ते मलकापूरला घरीच असतात. या पाच भावंडांमधील सर्वांत लहान भावाचा तीन वर्षांपूर्वी अपघातात मृत्यू झाला. वडीलही काही वर्षांपूर्वी गेले. एकामागून एक दुःख सहन करणाऱ्या या कुटुंबावर संजय यांच्या मृत्यूमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

आज येणार पार्थिव 
संजय राजपूत यांचे पार्थिव आज (ता. 16) सकाळी आठ वाजता नागपूर विमानतळावर येईल. या ठिकाणी त्यांना मानवंदना देण्यात येईल आणि त्यानंतर मलकापूरच्या दिशेने रवाना करण्यात येईल. मलकापूर येथे दुपारी चार वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे कुटुंबीयांनी सांगितले. 

माहेरची मंडळी दाखल 
घटनेची माहिती मिळताच वीरपत्नी सुषमा यांच्या माहेरची मंडळी नागपुरात दाखल झाली. त्यांचेही कुटुंब मलकापूरचेच आहे. त्यांच्या आई, भाऊ, काका आणि चुलत भाऊ यांनी नागपूर गाठले. पोटच्या पोरीचा पंधरा-सोळा वर्षांचा सुखाचा संसार विस्कळित झालेला बघून त्यांच्या आईलाही अश्रू अवरत नव्हते. 

"त्याला लढायचे होते' 
माझ्या भावात शत्रूचा सामना करण्याची जिद्द होती. शत्रूशी लढताना वीरमरण यावे, असे तो म्हणायचा. दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात तो हुतात्मा झाला. देशसेवेत असताना माझ्या भावाला मरण आले, याचा अभिमान आहे. पण शत्रूची छाती फोडून काढण्याची संधी मिळाली असती तर त्याला अधिक आनंद झाला असता. भारत सरकारने हुतात्मा झालेल्या सर्व जवानांचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करावे आणि शत्रूला अद्दल घडवावी, अशा भावना राजेश राजपूत यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com