सिलिंडर हवे; तर जा गोदामात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

सावनेर - शहराप्रमाणे ग्रामीण भागातही सिलिंडर मिळण्यासाठी लागणारा अवधी अधिक असल्यामुळे ग्रामस्थांमध्येही अलीकडे संताप व्यक्‍त होऊ लागला आहे. १२ ते १५ दिवस लोटूनही सिलिंडर मिळत नसल्याने ग्रामस्थ वैतागले आहेत. याबाबत विचारणा केल्यास गोदामात जाण्याच्या सल्ला दिला जात असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

सावनेर येथे वैभव इंडियन गॅस एजन्सीचे कार्यालय आहे. ऑनलाइन नंबर लावल्यानंतरही ग्राहकांना १० ते १५ दिवसानंतरही सिलिंडर मिळत नाही. याबाबत विचारण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून गोदामात जाण्याचा सल्ला दिला जातो. १२ ते १५ दिवस वाट पाहूनही घरपोच सेवा मिळत नाही. दोन ते तीनवेळा चिचपुरा वस्तीतून पायदळ यावे लागले. तरीही सिलिंडर मिळाले नाही. १५ दिवसांनंतर पावती मिळाली. आता सिलिंडरसाठी गोदामात जाण्यास सांगितले, असे सावनेर येथील कदम यांनी सांगितले. 

१८ तारखेला सिलिंडरचा नंबर लावला. दोन दिवसांअगोदर सिलिंडर खाली झाले. सिलिंडरसाठी पायपीट करावी लागत  आहे, असे तिळंगी येथील विनायक खाटी व नक्षत्र कॉलनी येथील सुधाकर बोबडे यांनी सांगितले. तेव्हा लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

सिलिंडरचा साठा रोज येतो. तसेच मागणीही जास्त आहे. परंतु, ग्राहकांना मोठी घाई असते. ते थांबायला तयार नसतात.
- श्री. घोडेस्वार, मालक, वैभव इंडियन गॅस एजन्सी.

१६ दिवसांपासून घरपोच सिलिंडर मिळेल, या आशेवर होतो. परंतु, सिलिंडर मिळाले नाही.  शेवटी गॅस एजन्सीकडून पावती घेऊन गोदामातून सिलिंडर आणले. चार महिन्यांपासून हीच परिस्थिती आहे. घरपोच सेवा देण्याची जबाबदारी टाळण्यासाठी मुद्दाम विलंब करीत असावे.
- अरविंद ताजने, नगरसेवक, माताखेडी, सावनेर

Web Title: cylinder shortage in savner